मुंबई: अभिनेत्री कंगना रणौत आणि तिची बहिण रंगोली यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश वांद्रे कोर्टाने मुंबई पोलिसांना दिला आहे. या प्रकरणामुळे कंगनाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कंगना आणि रंगोली ट्विट आणि मुलाखतींच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे वांद्रे पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी तक्रारीची दखल न घेतल्याने तक्रार कर्त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
वांद्रे कोर्टात कंगनाविरोधात याचिका दाखल केली होती. याचिकेत आरोप करण्यात आला आहे की, कंगना बॉलिवूडमधील हिंदू आणि मुस्लिम कलाकारांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. याशिवाय ती हिंदू-मुस्लिम समुदायात धार्मिक तेढही निर्माण करत आहे.
कोर्टासमोर कंगनाचे ट्विट्स आणि व्हिडीओ सादर:
कंगना वारंवार आक्षेपार्ह ट्विट करत असून यामुळे केवळ धार्मिक भावनाच नाही तर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याचिकाकर्त्यांनी कोर्टासमोर पुरावे म्हणून कंगनाचे ट्विट्स आणि व्हिडीओ सादर केले. त्यानंतर कोर्टाने कलम १५६ (३) अंतर्गत एफआयआर दाखल करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत.
याचिकाकर्त्यांना आधी वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. पण पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला. यावेळी कोर्टाने कंगनाविरोधात एफआयआर दाखल कऱण्याचा आदेश दिला. कंगना बॉलिवूडला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असून सोशल मीडियापासून ते टीव्हीपर्यंत सगळीकडे विरोधात बोलत असल्याचेही कोर्टाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.