शिवसेनेची सामना तून भाजपावर बोचरी टीका
मुंबई: एका पक्षाविरुद्ध तिघे लढल्यानं पराभव झाला असं म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्यावर शिवसेनेनं जोरदार टीका केली आहे. ‘आम्ही सर्वशक्तिमान आहोत. एकटेच लढणार व जिंकणार ही खुमखुमी त्यांचीच होती. ती चांगलीच जिरली आहे,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेची महाविकास आघाडी एकदिलाने लढली. भाजप-शिवसेना एकत्र असताना शिवसेनेची टांग खेचण्यासाठी जागोजागी गुप्त बंडखोर उभे करून भाजप खेळ बिघडवत होता. आता तिघांत तसे झाले नाही. यापासून भाजपनं धडा घ्यावा, असा सल्लाही शिवसेनेनं दिला आहे.
‘वाऱ्याने दिशा पकडलीय! कुजलेला पालापाचोळा आता उडून जाईल’:
‘नागपूर व पुण्यातील भाजपचा पराभव ही बदललेल्या वादळी वाऱ्याची चाहूल आहे. वाऱ्याने एक दिशा पकडली आहे व राज्यातील साचलेला, कुजलेला पालापाचोळा उडून जाणार आहे,’ अशी बोचरी टीका शिवसेनेनं भाजपवर केली आहे. विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला. महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी या निवडणुकीत दणदणीत यश मिळवलं आहे. या निकालानंतर सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांनी भाजपला पुरतं घेरलं आहे. शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर, विशेषत: चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘महाविकास आघाडीचे सरकार हे अनैसर्गिक आहे, त्यांना जनतेचा पाठिंबा नाही असे बोलणाऱ्यांनी शिक्षक-पदवीधरांनी दिलेल्या निकालाकडे जाड भिंगाचा चष्मा लावून पाहावे,’ असं शिवसेनेनं सुनावलं आहे. ‘वर्षभरापूर्वी १०५ आमदार येऊनही सत्ता गेली. तेव्हापासून महाराष्ट्र भाजपास सुतक लागले. कालच्या नागपूर-पुण्यातील पराभवाने आणखी एक सुतक लागले. एका वर्षात दोनदा सुतक लागणे हे हिंदू शास्त्रानुसार चांगले नाही. भाजपला काहीतरी तोड करावीच लागेल,’ अशी तिखट टीकाही शिवसेनेनं केली आहे.