विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दगडू लोमटे यांची निवड

नेपाळ मध्ये जानेवारीत होणार संमेलन

अंबाजोगाई: येथील यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचे सचिव, मसाप अंबाजोगाई शाखेचे अध्यक्ष साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्ते दगडू लोमटे यांची अमरावती येथील शब्द परिवार या संस्थेच्या वतीने नेपाळ येथे आयोजित केलेल्या ७ व्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड जाहीर केली आहे. ही घोषणा शब्द परिवाराचे प्रमुख संजय सिंगलावर, अमरावती यांनी केली आहे. शब्द परिवार अमरावती यांच्या वतीने २०१४ पासून हे विश्व मराठी साहित्य संमेलन सुरू केले आहे.

यापूर्वी बँकॉक, दुबई, इंडोनेशिया, माले, श्रीलंका, मालदीव येथे ही संमेलने झाली आहेत. यावेळी ते नेपाळ येथे होणार आहे. यापूर्वी किशोर कदम (सौमित्र), ज्ञानेश वाकुडकर, संजय आवटे, सिद्धार्थ भगत व प्राचार्य नागनाथ पाटील यांनी या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे. या वर्षी नेपाळ येथे होणाऱ्या ७ व्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी, साहित्यिक व साहित्य, संगीत, सामाजिक, पर्यावरण, कला क्षेत्रातील महत्वाचे कार्यकर्ता म्हणून कार्य केलेल्या दगडू लोमटे यांची निवड केली आहे.

दगडू लोमटे यांच्या अनेक कविता, लेख प्रसिद्ध आहेत. राहून गेलेली पत्रे हे ललित बंध व पांगलेल्या प्रार्थना हा कविता संग्रह प्रसिद्ध आहे. त्यांना यापूर्वी  शब्द सह्याद्री प्रतिष्ठानचा पुरस्कार परभणी, बाबा आमटे सामाजिक कार्य विशेष पुरस्कार  शांतीवन बीड, स्नेहालय नगरचा डॉ. सुब्बाराव पुरस्कार, साहित्य व कला प्रसारिणी मंडळ पुणे विशेष कार्य पुरस्कार, मारवा फाऊंडेशन पुणे यांचा संगीत कार्य व प्रसारासाठी डॉ. अण्णासाहेब गुंजकर पुरस्कार, सामाजिक एकोपा व शांती यासाठी जमाते इस्लामी हिंद अंबाजोगाईचा सामाजिक सौहार्द पुरस्कार, आद्यकवी मुकुंदराज काव्य रत्न पुरस्कार, भारत जोडो अकादमी किनवट, कार्यकारिणी सदस्य व सांस्कृतिक प्रमुख मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद, ललित कला अकादमी, आनंदवन मित्र मंडळ अशा अनेक संस्थांचे  ते पदाधिकारी राहिले आहेत. बाबा आमटे यांच्या भारत जोडो अभियान सायकल यात्रेत १९८५ साली सहभाग, कन्याकुमारी ते काश्मीर असे ते अभियान होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *