नवी दिल्ली: यंदाच्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर महाराष्ट्रातील जैवविविधतेवर आधारित चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. या चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जैवविविधतेचं दर्शन संपूर्ण भारतवासीयांना घडून आले. काही दिवसांपुर्वी सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र सरकारने या चित्ररथाला परवानगी नाकारण्यात आली होती. परंतु पुन्हा केंद्राने आपला निर्णय बदलला आणि दिल्लीतील राजपथावरील संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला अखेर परवानगी मिळाली. त्यामुळे आजचा महाराष्ट्राच्या चित्ररथ अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरला.
‘महाराष्ट्राची जैवविविधता’ या विषयावर आधारित या देखण्या चित्ररथाच्या अग्रभागी कास पठाराला स्थान देण्यात आलं होतं. युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा स्थळांच्या यादीत कास पठाराचा समावेश असून येथे आढळणाऱ्या दुर्मिळ फुलांसोबतच ‘सुपरबा’ या दुर्मिळ सरड्याची प्रतिकृतीही साकारण्यात आली आहे. महाराष्ट्राचा राज्यप्राणी ‘शेकरू’च्या सुमारे 15 फुटांची आकर्षक प्रतिकृती सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. याशिवाय चित्ररथाच्या पुढच्या भागात महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू ‘ब्ल्यू मॉरमॉन’च्या आठ फूट उंचीच्या देखण्या प्रतिकृतीने चित्ररथाची शोभा वाढवली. तसेच महाराष्ट्राचे राज्यफुल ‘ताम्हण’चे सुमारे दीड फूटाचे गुच्छही ठेवण्यात आले आहेत. त्यावर छोटी छोटी फुलपाखरेही दाखवण्यात आली आहेत. चित्ररथावरील महाराष्ट्राचा राज्यपक्षी ‘हरियाल’च्या प्रतिकृतीवर अनेकांच्या नजरा खिळून राहिल्या तसेच शेवटच्या टप्प्यातील सुमारे 15 फुटाचं आंब्याचे झाड विशेष आकर्षक दिसत होते.