# विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करूनच अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय.

राज्य समितीच्या शिफारशी आणि कुलगुरूंच्या सूचना केंद्रबिंदू मानूनच पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय -उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

मुंबई: राज्यातील १३ अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरू आणि राज्य समितीच्या शिफारशींना केंद्रबिंदू मानूनच पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

श्री.सामंत म्हणाले, लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि भवितव्याचा विचार करून पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची भूमिका राज्य शासनाने घेतली आहे, यामध्ये केवळ विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून आणि राज्यातील कोविड – 19 च्या वाढत्या प्रादुर्भावाची सद्यस्थिती पाहता राज्यातील कोणतेही विद्यापीठ परीक्षा घेऊ शकत नाही, अशी शिफारस अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू आणि राज्य समितीने केल्यामुळे राज्य शासनाने अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

दिनांक ६ एप्रिल २०२० रोजी उच्च व तंत्र शिक्षण विभागाची पहिली बैठक झाली. या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा कशा घ्यायच्या याची पडताळणी करण्यासाठी एक राज्य समितीची स्थापना करण्यात आली. सहा व्यक्तींची ही समिती स्थापन करण्यात आली होती. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर हे त्या समितीचे प्रमुख होते. त्यानंतर दि.२९ एप्रिल रोजी यूजीसीच्या मार्गदर्शक सूचना आल्या. त्यामध्ये कोरोनाच्या परिस्थितीत राज्य शासनाने निर्णय घ्यावा आणि विद्यापीठांना मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात असे सांगण्यात आले होते.

राज्य समितीने दिनांक ६ मे २०२० रोजी आपला अहवाल राज्य शासनास सादर केला. त्यानंतर राज्यपाल महोदय यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली आणि शासनाने समितीचा अहवाल स्वीकारला. त्यानंतर खात्याचा मंत्री म्हणून केवळ विद्यार्थी हित लक्षात घेत, दिनांक १७ मे २०२० रोजी विद्यापीठ अनुदान आयोगास (यूजीसी) अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची विनंती करणारे पत्र लिहिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून परीक्षा रद्द करण्याची विनंती केली होती.

‌एटीकेटीच्या विद्यार्थ्यांबाबत १३ अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंनी आपला निर्णय सर्वानुमते राज्य सरकारला पाठविला आहे. ज्यामध्ये सरासरी गुण देऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याची शिफारस केली आहे. तसेच सरासरी गुण देऊनही जर एटीकेटीचा विद्यार्थी उत्तीर्ण होणार नसेल तर त्याला विशेष सवलत म्हणून ग्रेस मार्क देण्याची शिफारस सुध्दा करण्यात आली आहे. राज्य सरकार सर्व निर्णय सर्व कुलगुरू यांच्याशी चर्चा करूनच घेत आहे.

सध्याच्या परिस्थितीत परीक्षा घ्यायच्या असतील तर कन्टेन्मेंट झोनमधील विद्यार्थी आणि गावी गेलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा कशी द्यायची, पेपर सेट करणे, पेपर तपासणी, विशेषतः कंन्टेन्मेट झोनमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी क्वारंटाइन सुविधा कशी असेल?  असे अनेक प्रश्नही उपस्थित होताहेत. याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने मार्गदर्शक सूचना देणे आवश्यक होते.

सर्व निर्णय हे कुलगुरूंशी चर्चा करूनच घेतले जातात. राज्य शासन कुलगुरूंशी चर्चा करीत नाही हा अपप्रचार केला जात आहे हे चुकीचे आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून विद्यापीठांच्या अडचणी आणि प्रश्नांना सोडवण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली जात आहे. विशेषतः विद्यापीठांना आवश्यक ती सर्व मदत राज्य शासन करीत आहे. शासनाची भूमिका प्रामाणिक आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर कोणीही राजकारण करू नये, अशी सर्वांना विनंती आहे.

पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेऊ नयेत असे पत्र विद्यापीठ अनुदान आयोगास पाठविले आहे. ज्यामध्ये कोरोना रूग्ण संख्येत आज भारत जगामध्ये तिसऱ्या स्थानी असून, महाराष्ट्र हे सर्वाधिक कोरोना बाधित राज्य आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये अंतिम वर्षाच्या सत्राच्या दहा लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची परिक्षा घेणे अतिशय जिकीरीचे होणार आहे. तसेच त्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक, पूरक कर्मचारी तसेच इतर यंत्रणांचे स्वास्थ धोक्यात येऊ शकेल.

सध्या विविध शैक्षणिक संस्था, वसतीगृहे आणि इतर सुविधा या विलगीकरणासाठी तसेच कोरोना संबंधित इतर कारणांकरिता प्रशासनाद्वारे अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बहुतांशी विद्यार्थी हे त्यांच्या मूळ गावी परतले असल्याने, परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांचा परतीचा प्रवास, त्यांची निवास व भोजन व्यवस्था या चिंतेच्या बाबी आहेत. असे केल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येऊन त्यांच्या भवितव्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच काही इतर राज्यांमध्ये तसेच देशांमध्ये परीक्षा घेतल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना सदर विषाणूची लागण झाल्याच्या घटना घडल्या आहेत असेही श्री. सामंत यांनी या पत्राद्वारे निदर्शनास आणून दिले आहे. या पत्रकार परिषदेस उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *