अंबाजोगाई: राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते ऑनलाईन तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत अंबेजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील १००० खाटांच्या अद्ययावत कोविड हॉस्पिटलचे सोमवार, ३१ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता लोकार्पण होणार आहे.
जिल्ह्यात वाढलेल्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अत्यंत कमी वेळेत बळ मिळवून दिले आहे. व्हेंटिलेटर्स, पीपीई किट्स, अँटिजन रॅपिड टेस्टिंग यासह विविध सुविधांसाठी कोट्यवधी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे.
वाढत्या रुग्ण संख्येमुळे अंबेजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयात १००० खाटांचे सर्व सोयीसुविधा युक्त, प्रशस्त व अद्ययावत रुग्णालय अत्यंत कमी वेळेत जिल्हा आरोग्य विभागाने उभे केले आहे.
या रुग्णालयाचे लोकार्पण राजेश टोपे यांच्या हस्ते दुपारी एक वाजता ऑनलाईन होणारआहे. या कार्यक्रमासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. शिवकन्या शिरसाट, खा. डॉ. प्रीतम मुंडे, आ.सतीश चव्हाण, आ.प्रकाश सोळंके, आ.सुरेश धस, आ.बाळासाहेब आजबे, आ.विनायक मेटे, आ.लक्ष्मण पवार, आ.संजय दौंड, आ.नमिता मुंदडा, आ.विक्रम काळे, आ.संदीप क्षीरसागर, जि. प. उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर पापा मोदी, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, माजी आ.पृथ्वीराज साठे, लोखंडी सावरगावचे सरपंच राजपाल देशमुख तसेच जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात आदी उपस्थित असणार आहेत.
असे असेल कोविड रुग्णालय:
रुग्णालयातील एक हजार खाटापैकी २५० खाटांचे कोविड केअर सेंटर असेल, २५० खाटांचे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल असेल; २५० खाटापैकी २०० खाटावर ऑक्सिजनची व्यवस्था असेल. तसेच उर्वरित ५०० खाटांचे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर असेल. यामध्ये ३०० खाटांना ऑक्सिजनची सुविधा असेल. या हॉस्पिटलमध्ये ७० व्हेंटिलेटर्स उपलब्ध करण्यात आले आहेत.
या रुग्णालयासाठी डॉक्टर्स, अन्य स्टाफ असे जवळपास ६० जणांचे मनुष्यबळ उपलब्ध असणार आहे. रुग्ण संख्या वाढल्यास ही संख्या देखील वाढविण्यात येईल. तसेच अंबेजोगाई, परळी, माजलगाव, वडवणी, केज, धारूर या तालुक्यातील सरकारी व खाजगी डॉक्टर्सनाही आवश्यकतेनुसार याठिकाणी सेवा देण्यास बोलवण्यात येणार आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले आहे.