पालकमंत्री धनंजय मुंडे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या ऑनलाईन उपस्थितीत कार्यक्रम
अंबेजोगाई: तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील १००० बेडच्या मराठवाड्यातील सर्वात मोठ्या कोविड रुग्णालयाचे आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. या रुग्णालयाच्या निर्मितीने कोविडविरुद्धच्या लढ्याला बळ मिळणार असून आरोग्य सुविधांमध्ये हे रुग्णालय मैलाचा दगड ठरणार असल्याचे मत यावेळी राजेश टोपे यांनी व्यक्त केले.
बीड जिल्ह्याचा शेजारी आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा मित्र म्हणून बीड जिल्ह्यातील आरोग्य सुविधांसाठी मला कधीही आवाज द्या, राज्याचा आरोग्यमंत्री म्हणून मी सदैव बीड जिल्ह्यातील समस्यांना मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध आहे असे यावेळी टोपे म्हणाले.
बीड जिल्ह्यातील कोविड विरुद्धच्या लढ्यात अत्यंत कमी वेळेत उभारण्यात आलेल्या या कोविड रुग्णालयामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम झाली असून रुग्णांना योग्य व वेळेत उपचार होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत मिळणार आहे. आरोग्य विभागाकडून, जिल्हा नियोजन समितीतून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असा सर्व प्रकारांमधून निधी उपलब्ध केला आहे व पुढेही आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देऊ. जिल्ह्यातील आरोग्य सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही, असे मत यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमासाठी आ. प्रकाश सोळंके, आ. संजय दौंड, जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शिवकन्या शिरसाट, माजी आ.पृथ्वीराज साठे, श्री.नरेंद्र काळे, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, आरोग्य उपसंचालक डॉ.माले, अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती मंजुषा मिसकर, श्री.सचिन मुळूक, श्री. राजकिशोर मोदी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर बी. पवार, दत्ता पाटील, शंकर उबाळे, बबन लोमटे, राजपाल लोमटे, तानाजी देशमुख, विष्णूपंत सोळंके, बाळासाहेब शेप, कल्याण भिसे, रखमाजी सावंत, प्रशांत जगताप, विलास मोरे, अख्तर जहागीरदार, रणजित लोमटे, लोखंडी सावरगावचे सरपंच राजपाल देशमुख यांच्यासह परिसरातील लोकप्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच आदी उपस्थित होते.
आरोग्य विभागाकडून आणखी ३५ कोटी रुपये निधी अपेक्षित:
यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी ऑनलाईन संवाद साधत जिल्ह्यातील आरोग्य उपाययोजनांसाठी आणखी ३५ कोटी रुपये निधी अपेक्षित असून तो तातडीने मंजूर करण्यात यावा, याबाबत विनंती केली. तसेच माजलगाव येथे उपजिल्हा रुग्णालय निर्मिती, जिल्हा रुग्णालयात २०० खाटा वाढवणे यांसह जिल्ह्यातील अन्य उपाययोजनांबतही मागणी केली.
यावेळी राजेश टोपे यांनी ३५ कोटी रुपये निधी मंजूर करण्याबाबत तसेच जिल्ह्यातील अन्य सर्वच मागण्यांबाबत आरोग्य विभाग सकारात्मक असून लवकरच निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वस्त केले.
संपूर्ण रुग्णालयाचा आढावा:
कोनशीला लोकार्पण झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी रुग्णालयातील विविध वॉर्डांना भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली. यावेळी ऑक्सिजन उपलब्धता, व्हेंटिलेटर्स, स्वच्छता, मनुष्यबळ, उपचार पद्धती, उपलब्ध साधनसामग्री व औषधसाठा यासह सर्व बाबींची माहिती व बारकावे मुंडे यांनी समजून घेत आवश्यक सूचना केल्या.