# भूमी अभिलेख विभागातील बदल्या रद्द करण्याचे महसूल मंत्र्यांना साकडे.

बदल्यांमध्ये गैरप्रकार झाल्याने संबंधित दोषींवर कारवाईची मागणी

औरंगाबाद: भूमी अभिलेख विभागात अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये गैरप्रकार झाला आहे. याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी. तसेच नियमबाह्यपणे झालेल्या या बदल्या रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे विभागीय अध्यक्ष सुमित भुईगळ यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या करताना गंभीर आजारी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करताना त्यांच्यावर अन्याय करण्यात आला आहे. तसेच बदल्यांबाबतच्या 2018 च्या जीआरची पायमल्ली करण्यात आली आहे. बदल्या करताना बदलीस पात्र अधिकारी, कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता यादी करणे आवश्यक असताना ज्येष्ठता यादी तयार करण्यात आली नाही. याबरोबरच समुपदेशन प्रक्रियाही अवलंबली नाही. एकाच विभागात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा त्याच विभागात बदली दिलेली आहे. त्यामुळे बदलीस पात्र अन्य अधिकाऱ्यांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे नियमबाह्यपणे झालेल्या या बदल्या रद्द करण्यात याव्यात. तसेच या संपूर्ण प्रकारची चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनाच्या प्रति मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव महसूल व वन विभाग, मुंबई, यांच्यासह जमाबंदी आयुक्त आणि संचालक यांनाही पाठवल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *