परभणीच्या आरडीसी स्वाती सूर्यवंशीसह अन्य दोन कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात;
गंगाखेड नगर पालिका विकास कामाच्या मान्यतेसाठी साडेचार लाख रूपये घेताना पकडले रंगेहात
परभणी: गंगाखेड नगरपालिकेतील विकास कामासाठीच्या प्रशासकीय मान्यतेसाठी ४ लाख ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती घेतल्याप्रकरणी निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्यासह एक अभियंता व एक अव्वल कारकूनास लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने मंगळवार, ८ सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले.
गंगाखेड नगरपालिकेतील विकास कामाच्या प्रशाकीय मान्यतेसाठी नगर पालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर प्रशासन विभागाकडे या बाबतचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला मंजूरी मिळविण्यासाठी नगर पालिकेतील एक नगरसेवक निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्याकडे पाठपुरावा करीत होता. मात्र, या प्रस्तावाच्या एकूण रक्कमेच्या दीड टक्के प्रमाणे चार लाख ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी स्वाती सूर्यवंशी यांनी अन्य दोघा कर्मचाऱ्यां मार्फत केली होती, अशी तक्रार संबंधित नगरसेवकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केल्यानंतर काल सोमवारी एसीबीच्या पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन पडताळणी केली. त्या पडताळणीत नगर प्रशासन विभागातील अव्वल कारकून श्रीकांत विलासराव करभाजने व गंगाखेड पालिकेचे स्थापत्य अभियंता अब्दुल हकीम अब्दुल खयुम यांनी प्रशाकीय मान्यतेसाठीच्या ४ लाख ५० हजार रुपयांच्या रकमेची मागणी केल्याचे व ही मागणी निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्या सांगण्यावरून केल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून आज मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून केलेल्या कारवाईत अव्वल कारकून करभाजने व अभियंता अब्दुल खयुम यांनी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती सूर्यवंशी यांच्या सांगण्यावरून साडेचार लाख रुपयांची रक्कम ताब्यात घेतली. त्याचवेळी पथकाने या दोघांसह स्वाती सूर्यवंशी यांनाही ताब्यात घेतले.
या प्रकरणी नवामोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. एसीबी पथकाचे उपअधीक्षक भरत हुंबे, निरीक्षक अमोल कडू, जमीलोद्दीन जहागीरदार, शेख शकील, अनिल कटारे, माणिक चट्टे, अनिरुध्द कुलकर्णी, सचिन धबडगे आदींनी ही कारवाई केली.