पुणे: ग्रामीण भागात पर्यटन स्थळे ,तलाव ,उद्याने पर्यटन स्थळे म्हणून विकसित केल्यास त्याची मदत गावातील विकासाला मोठ्या प्रमाणात होऊ शकते आणि त्यामुळे गावांचा विकास अधिक जलद गतीने होईल असे मत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी लवळे येथील तळजाई तलाव सुशोभीकरण आणि विकास कामांचा उद्घाटन समारंभ प्रसंगी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आयोजन ऑक्सफर्ड गोल्फ क्लब, फ्लेम विद्यापीठ व लवळे ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले होते.
पुढे ते म्हणाले की ,प्रधानमंत्री यांनी ग्रामीण भागाचा विकास होण्यासाठी अमृत सागर योजना सुरू केली आहे .त्यानुसार गावातील पाझर तलाव विकसित करण्यासाठी व पर्यटन स्थळ निर्माण होण्यास या योजनेचा फार मोठी मदत होईल आणि ती आपण करून घेतली पाहिजे असे आवाहन प्रसाद यांनी केले . यावेळी आयुष प्रसाद यांच्या हस्ते लवळे तलावाच्या सुशोभीकरण व विविध विकासकामाचा भूमिपूजन शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविक भाषणात ज्येष्ठ उद्योजक, ऑक्सफर्ड ग्रुप चे संस्थापक अनिल सेवलेकर म्हणाले की प्रत्येक उद्योजकांनी गावाचा विकास होण्यासाठी मदत केल्यास देशातील ग्रामीण भाग लवकरच समृद्ध होईल .त्यासाठी शासन आणि उद्योजक यांनी एखादी योजना तयार करावी त्यास आमच्यासारखे आणखी लोक पुढे येऊन गावाचा विकास करण्यास मदत करतील अशी अपेक्षा व्यक्त केली .
या कार्यक्रमास ज्येष्ठ उद्योजक अनिल सेवलेकर, गटविकास अधिकारी संदीप जठार, फ्लेम विद्यापीठाचे वीरेंद्र शर्मा, लवळे गावचे सरपंच निलेश गावडे , उद्योजक नाथाजी राऊत, ग्रामविकास अधिकारी, व्ही. डी. साकोरे, उपसरपंच रणजीत राऊत तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.