# धनंजय मुंडे यांचीही कोरोनावर मात; रूग्णालयातून डिस्चार्ज.

 

मुंबई: सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना आज सोमवारी दुपारी ब्रीच कँडी रुग्णालयातून चार वाजण्याच्या सुमारास डिस्चार्ज देण्यात आला. मागील अकरा दिवसांपासून ते या रुग्णालयात कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे औषधोपचार घेत होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांची दुसरी टेस्टही निगेटिव्ह आल्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

रुग्णालयातून बाहेर पडताना त्यांनी हात उंचावून आणि हात जोडून रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना 12 जून रोजी कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. मुंडे यांचा ड्रायव्हर, स्वीय सहाय्यकासह पाच कर्मचारीही बाधित झाले होते. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झाली होती. या दोन्ही मंत्र्यांनी कोरोनावर मात केली असून त्यांनी पुन्हा कामकाजाला सुरूवात केली आहे. आता धनंजय मुंडे यांनीही कोरोनावर मात केली आहे. तेही देखील लवकरच कामकाजाला सुरूवात करतील. धनंजय मुंडे यांचा दुसरा अहवालही कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना आज सुटी देण्यात आली आहे. त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आल्यामुळे परळी, अंबाजोगाई, बीड जिल्ह्यासह राज्यभरातील त्यांच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *