घनसावंगी भूमी अभिलेख कार्यालयाचा उपक्रम
जालना: महसूल सप्ताह दिनांक १ ते ७ ऑगस्ट दरम्यान सुरू आहे. यातील शिवाय फेरी कार्यक्रम अंतर्गत मराठवाडा विभागाचे विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांनी घनसावंगी (जि.जालना) येथे भेट दिली असता त्यांनी तहसील व भूमी अभिलेख विभागाच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांचे स्वागत उप अधीक्षक भूमी अभिलेख शालिनी बिदरकर यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ, तहसीलदार योगिता खटावकर, उपविभागीय अधिकारी दीपक पाटील उपस्थित होते.
यावेळी भूमी अभिलेख विभागाच्या कामाची माहिती उप अधीक्षक भूमी अभिलेख शालिनी बिदरकर यांनी दिली. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने शिवार फेरी आयोजित करणे, अतिक्रमित रस्ते मोकळे करून त्याची अंमलबजावणी करणे. गावनिहाय अतिक्रमीत रस्त्यांची संख्या सादर करणे याकामी भूमी अभिलेख विभागाची भूमिका महत्वपूर्ण ठरते.
महसूल सप्ताह निमित्ताने विविध दाखले वाटप कार्यक्रम अंतर्गत खातेदारांना ‘क’ प्रतीचे वितरण विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड व जिल्हाधिकारी श्रीकृष्ण नाथ पांचाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी दीपक पाटील, तहसीलदार योगिता खटावकर, उप अधीक्षक शालिनी बिदरकर यांच्यासह खातेदार व भूमी अभिलेख विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, शनिवार ६ ऑगस्ट रोजी सुटीच्या दिवशीही नागरिकांच्या सोयीसाठी कार्यालय सुरू ठेवून कमी जास्त पत्रके (कजाप) तयार करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रभारी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख श्रीकृष्ण शिंदे यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले.