लहानथोर सगळ्यांनाच दिवाळीचे सगळ्यात मोठ्ठे आकर्षण असते. सुट्टीचे! फराळ, फटाके, नवीन कपडे, फिरायला जाणे या सगळ्या ‘मज्जा’ त्यानंतर येतात. परंतु समाजात असे अनेक अभागी असतात ज्यांना दिवाळीची सुट्टी मिळत नाही. तुमच्याआमच्या आनंदासाठी त्यांना स्वत:च्या आनंदावर पाणी सोडावे लागते. सीमेवर दक्ष असलेल्या जवानांची आठवण आपण ठेवतो. परंतु आपल्या शहरातही समाजाच्या आनंदासाठी कर्तव्यदक्ष राहणारी अनेक मंडळी असतात. अशाच काहींच्या दिवाळी गोड कशी असेल.
उत्साहाचा झरा ‘वाहता’ राहावा म्हणून: दिवाळीचा उत्साहाचा झरा ‘वाहता’ राहावा यासाठी सार्वजनिक वाहतूक विभागाचे कर्मचारी कामावर हजर असतात. बेस्ट व एसटीचे ड्रायव्हर-कंडक्टर, उपनगरी रेल्वेचे मोटरमन-गार्ड आणि मेल-एक्स्प्रेसचे ड्रायव्हर-असिस्टंट ड्रायव्हर! सणासुदीला घरी जाणाऱ्यांच्या आनंदातच ते स्वत:चा सण साजरा करतात. सीमेवरील सैनिकांची दिवाळीही अशीच साजरी होते ना. त्यांना तर सहासहा महिने घरी जाता येत नाही. दिवाळीच नव्हे तर सर्व सण सहकाऱ्यांसोबत साजरा करत असतात. प्रत्येक स्थानकात ‘रनिंग रूम’मध्ये सगळ्या जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन असेल तो सण साजरा करतात. दिवाळीसारख्या तीन-चार दिवसांच्या सणामध्ये कामाच्या पाळ्या अशा पद्धतीने लावून घेतो की एक दोन दिवस घरच्यांसोबत राहायला मिळते. सणाच्या वेळी ज्या स्थानकावर असतो तेथील विश्रांतीच्या खोलीमध्ये उत्साहात सण साजरा कसा होईल त्यांचे नियोजन केले जाते. कुठला ही सण असला की सर्व सामान्य जनतेला सेवा सुरळीत देण्यासाठी तत्परतेने कार्य केले जाते. हे सर्व करत असतांना आमच्या दिवाळीचे काय ? पगार वेळेवर नाही, बोनस वेळेवर नाही. तुटपुंज्या पगारावर उत्साह साजरा महागाईच्या काळात कसा करावा. जे आहे त्यांच्या मध्ये समाधान मानून आपली परंपरा आणि संस्कृती जपवणूक वाहतूक कर्मचारी करत असतात.
दिवाळीही ‘बंदोबस्तात’च!: दिवाळीचे आणि पोलिसांचे सहसा वैरच असते! दिवाळीच्या दिवसात आपल्या सर्वाची सुरक्षितता राहावी म्हणून २४ तास कार्यशील असलेले पोलिस बांधव यांची दिवाळी ही आनंद आणि उत्साहाने साजरी करण्यासाठी मात्र कधी कुठला प्रसंग जर नकळत घडला तर आनंदावर पाणी सोडून आपले कार्य बजावण्यासाठी हजर असतात. आपल्या कार्याचे ठिकाण हेच आपलं घर असे समजून तिथे सजावट केली जाते आणि तिथे दिवाळी सण साजरा करतांना दिसतात. दिवाळी सण पोलीस बांधव यांना देखील बोनस वेळेवर जाहीर केला जात नाही. आज पोलिस यंत्रणा तप्तरतेने कार्य करते म्हणून शांतता असते. महाराष्ट्र मध्ये अनेक ठिकाणी पोलीसासाठी गृह वसाहती आहे. आज त्यांची काय परिस्थिती आहे हे प्रत्यक्ष त्याठिकाणी भेट देऊन लक्षात येते. पोलीस वसाहती मधील दिवाळी ही लेकरांची असते. आपल्या लेकरांना सणाचा आनंद मिळण्यासाठी पोलीस कर्मचारी आपला आनंद विसरून त्यांचा आनंद द्विगुणित करत असतो.
रुग्णसेवा हीच दिवाळी: दिवाळी सारखा सण घरच्यांसोबत साजरा करण्याची इच्छा प्रत्येकाला असते. पण ऐन दिवाळीतही एखादी सुट्टी वगळता कामावर हजेरी लावावीच लागते अशा व्यवसायांपैकी एक म्हणजे रूग्णसेवा. सध्या डेंगू आजराने अनेक रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. त्यामुळे ‘पाण्यात होणारी डासांच्या अंड्याची पैदास रोखण्यासाठी झोपडपट्ट्या, चाळी या ठिकाणी पाणी भरून ठेवलेल्या पिंपामध्ये ‘अबेट’ नावाचे औषध टाकण्याचे काम अनेकांन सध्या हे काम करावे लागत आहे. या शिवाय घराघरांतील रुग्णांची माहिती घेणे, माता आणि बालसंगोपन, कुटुंबनियोजन आदी माहिती कुटुंबांमध्ये जाऊन देणे आदी कामेही करावी लागतात. दिवाळीत लोकांच्या घरी जाऊन हे काम करणे बरेचदा जीवावर येते. पण यात कसूर करून चालत नाही. प्रत्येक दिवशी १२५ ते १५० कुटुंबांमध्ये भेट देण्याचे काम दिवाळीतही करावे लागणार आहे. दिवाळीत रुग्णांची संख्या त्या तुलनेत कमी असते. हा सण आपल्या घरी साजरा करता यावा यासाठी रुग्ण दिवाळीच्या आधीच सहसा ‘डिस्चार्ज’ घेतात. केवळ अपघात किंवा गंभीररित्या आजारी असलेले रुग्णच वॉर्डात असतात. पण, वॉर्डमध्ये सजावट करून, रुग्णांबरोबर आणि सहकाऱ्यांसमवेत गोडधोड आणि फराळ करून दिवाळी रुग्णालयात साजरा केला जातो. रुग्णालयात देखील आकर्षक सजावट करण्यात येते तिथे देखील उत्साहाचे वातावरण निर्माण केले जाते. आज असे फार कमी रुग्णालय आहे तिथे हे सर्व बघण्यास मिळते पण सरकारी रुग्णालय यामध्ये हे कधी बघण्यास मिळत नाही. त्यात तिथे काम करणारे कर्मचारी त्यांना देखील दिवाळी आंनदाने साजरी करण्यासाठी पगार व बोनस वेळेवर उपलब्ध होत नाही. तरी देखील कुठलं काही कारण न देता काम करतात.
आनंदाला नसे मोल: कितीही महागाई असो, विपरित स्थिती असो, रोजंदारीवर खपणारा कष्टकरी वर्ग नेहमीच प्रत्येक सण मोठय़ा जोशात साजरा करत आहे. शहरातील नाक्यांवर कामासाठी उभे राहणाऱ्या नाका कामगारांची दिवाळी कशी असणार याचा आढावा घेताना कामगारातून एकच सुर निघत होता. साहेब! आनंदाचे काय मोल नाही. सकाळी आपापल्या नाक्यावर जाऊन कामासाठी उभे राहणाऱ्या या कामगारांना आज हाताला काम मिळणार की नाही याची कधीच खात्री नसते. राज्यभरात अशा कामगारांची संख्या सुमारे १५ लाखांपेक्षा जास्त आहे. तर ज्यांच्या रोजच्या उत्पन्नाची निश्चिती नाही असे असंघटित कामगार कोटींच्या घरात आहेत. असे जरी असले तरी हा वर्ग सण साजरे करण्यामध्ये मागे नसतो. आपापल्या पध्दतीने हा सण साजरा करत असताना आर्थिक कुवतीनुसार गोड-धोड बनविले जातेच. कमी किमतीचे का असेनात पण नवीन कपडय़ांची खरेदी ते करतातच, दिवाळी ही खरी गरीबांचीच! कारण रोज गोड खाणाऱ्यांना दिवाळीच्या फराळाचे काय मोल राहणार. त्यामुळे उद्याची चिंता नसणारा कष्टकरी कामगारच सण अतिशय उत्सहात साजरा करत असतो. असह्य महागाई, बेरोजगारी अशा अनेक समस्यांच्या गर्तेतून जात असताना हातावर पोट घेऊन जगणारी ही माणसे सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करतात. त्यामुळे ‘आनंदाला काही मोल नसते’ याची प्रचिती येते.
आंनदावर विरजन: मागील दोन वर्षापासून कोविड आजाराने थैमान घातले होते. यामध्ये अनेक कुटुंबातील कर्ता व्यक्ती आपलं कुटुंब संसार अर्ध्या मधून निघून गेला. आपल्या जवळील व्यक्ती अचानक सोडून जाईल असे कधी वाटले देखील नाही. काळाने घात केला म्हणतात तसे प्रसंग अनेक महिलांच्या आयुष्यात आले. आज घरातील कमवणारा व्यक्ती नसल्याने दिवाळी गोड कशी होईल अशी चिंता अनेक महिलांना आहे. त्याचं बरोबरीने शेतकरी आत्महत्या झाल्या नंतर कुटुंबातील स्त्री आपल्या लेकरांना सणाचा आनंद मिळावा म्हणून जीवाचे रान करते आणि जे कष्ट करून पदरात मिळेल त्यावर दिवाळी सण साजरा करते. अशी परिस्थिती समाजात एकल महिलांची आहे. समाज म्हणून आपण आपल्या भगिनी साठी भाऊबीज म्हणून काही मदत सहकार्य करणे गरजेचे आहे. संकट आली तरी कधी न डगमळता आपले सण आणि संस्कृती जपणारी महिला ही आनंदावर विरजन फिरू देत नाही.
-मयुर बाळकृष्ण बागुल, पुणे
मोबाइल: ९०९६२१०६६९