नांदेडमधील गोदावरी रुग्णालयातील प्रकार; डॉक्टरसह कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल
नांदेड: मृत रुग्णावर सलग तीन दिवस उपचार सुरू ठेवल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड शहरात घडला आहे. शहरातील गोदावरी रुग्णालयामध्ये ही घटना घडली असून न्यायालयाच्या आदेशानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोविड महामारीच्या काळात एकीकडे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णसंख्या कमी करण्यासाठी डॉक्टर्स रात्रंदिवस रुग्णांची सेवा करीत आहेत. तर दुसरीकडे काही रुग्णालये सर्रास लूट करताना दिसत आहे. शहरातील गोदावरी रुग्णालयात देखील असाच प्रकार घडला आहे. रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णांकडून पैसे उकळण्याच्या नादात मृत्यू झाल्यानंतरही चक्क मृत रुग्णांवर उपचार केले. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
सिडको भागातील विणकर कॉलनीत राहणारे शिक्षक अंकलेश पवार हे कोविड पॉझिटिव्ह आल्यावर १६ एप्रिलपासून गोदावरी रुग्णालयामध्ये उपचार घेत होते. पण योग्य उपचार न करता केवळ बिलाची मागणी डॉक्टर करीत होते. पवार यांचा २१ एप्रिल रोजी मृत्यू झाल्यावरही केवळ पैसे उकळण्यासाठी त्यांचा मृत्यू २४ एप्रिल रोजी झाल्याचे रुग्णालयाकडून घोषित करण्यात आले. रुग्णालयाने पवार कुटुंबाकडून १ लाख ४० हजार रुपये बिल स्वरुपात आकारले आहेत. याविरुद्ध पवार यांच्या पत्नी शुभांगी पवार यांनी पतीच्या पार्थिवाच्या अवमानाबाबात न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने गोदावरी रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या बिलांची तपासणी केली. यात प्रशासन दोषी असल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला. जिल्हा सत्र न्यायालयाने गोदावरी रुग्णालयावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले, त्यानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गोदावरी रुग्णालयातील डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अॅड. शिवराज पाटील यांनी तक्रारकर्त्याची बाजू मांडली.
जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल मागवला
दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी हे चौकशी करून अहवाल सादर करणार आहेत. खरे तर हा प्रकार म्हणजे माणुसकीला काळिमा फासणारा व प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याचाच प्रकार असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.