पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची सूचना
औरंगाबाद: महानगर पालिका स्मार्ट सिटी अंतर्गत औरंगाबाद शहराच्या पायाभूत सोयीसुविधा विकसीत करण्याचे काम उत्तमरित्या करत असून यामध्ये नागरिकांच्या आणि पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त डबलडेकर इलेक्ट्रिक बससारख्या पर्यावरणपुरक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यावर महानगर पालिकेने भर देण्याची सूचना पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज येथे दिली.
स्मार्ट सिटी कार्यालयाच्या आयोजित महानगर पालिकेच्या विकास कामांच्या आढावा बैठकीत श्री.ठाकरे बोलत होते. यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई, आमदार अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, मनपा प्रशासक अस्तिककुमार पाण्डेय, मनपाचे अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाने, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ.पारस मंडलेचा यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मुंबईच्या धर्तीवर शहरात पर्यावरणपुरक अशा डबलडेकर इलेक्ट्रिक बस दाखल झाल्यास प्रवास क्षमता दुपटीने वाढून खर्चात कपात होईल. याकरिता महानगर पालिकेने पर्यावरणपुरक अशा या बस करीता लागणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याबाबत भर द्यावा. जेणेकरुन विकासाच्या दृष्टीने शहराच्या चिरंतन वाढीसाठी ही संकल्पना नक्कीच उपयोगी ठरेल असे सांगून क्रांतीचौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणीचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना श्री.ठाकरे यांनी दिल्या. तत्पूर्वी त्यांनी शहरातील वातावरणीय बदल या संदर्भातील डब्लुआरआयचे कार्यक्रम अधिकारी आशा ढवल यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर औरंगाबाद शहरात होत असलेले वातावरणातील बदल यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. यावेळी पालकमंत्री श्री.देसाई यांनी पर्याव्रण पुरक वाहतूक व्यवस्थेसंदर्भात विविध सूचना केल्या.
यावेळी मनपा आयुक्त अस्तिककुमार पाण्डेय यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृतीवन, सफारी पार्क, पाणीपुरवठा योजना, घनकचरा व्यवस्थापन, रस्ते, स्मार्ट बस, नेहरू भवन पुर्नविकास, माझी वसुंधरा, लाईट हाऊस, शहर विकास योजना, गुंठवारी विकास अधिनियम, ऐतिहासिक दरवाजे संवंर्धन, डॉ.सलीम अली तलाव संवर्धन, आरोग्य आदींसंदर्भात संगणकीय सादरीकरण केले.