औरंगाबाद: सातारा परिसरातील एमआयटीजवळील एका घरात बहीण भावाचा खून केल्याची खळबळजन घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. दोघा बहीण भावांचा गळा चिरलेले मृतदेह बाथरूममध्ये आढळले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
सातारा परिसर, एमआयटीजवळील अल्फाईन हॉस्पिटलजवळील लालचंद राजपूत हे शेतीच्या कामानिमित्त परिवारासह जालना येथे गेले होते. घरात त्यांची मोठी मुलगी किरण लालचंद राजपूत (१९) आणि तिचा भाऊ सौरभ राजपूत (१७) हे दोघे घरात होते. रात्रीच्या सुमारास लालचंद राजपूत हे घरी परतले. त्यांनी वाहनाचा हाॅर्न वाजविला मात्र घरातून प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी वाहन उभे करून घराची पाहणी केली असता बाथरूममध्ये दोघांचे मृतदेह आढळले. दोघांचे गळे चिरून खून करण्यात आला होता. आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटीत पाठवले. खुनाचे नेमके कारण कळू शकले नाही.
याबाबत पोलीसांनी सांगितले की, खून दुपारी झाला असून घटना रात्री उघडकीस आलीआहे. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.