# डाॅ.बा.आ.म. विद्यापीठ पदवी परीक्षा ९ ऑक्टोबरपासून.

पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वेळापत्रक सोमवारनंतर घोषित होणार

औरंगाबाद: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाचे वेळापत्रक आज शनिवारी जाहीर करण्यात आले. पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा ९ ऑक्टोबर पासून सुरु होणार आहेत, अशी माहिती परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.योगेश पाटील यांनी दिली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा १ ऑक्टोबर पासून सुरु होणार होत्या. तथापि कर्मचा-यांच्या राज्यव्यापी संपामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. या संदर्भात कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि.तीन) परीक्षा मंडळाची महत्वपूर्ण बैठक झाली. बैठकीस प्र-कुलगुरु डॉ.प्रविण वक्ते, सर्व अधिष्ठाता, परीक्षा मंडळाचे सदस्य उपस्थत होते. या बैठकीत परीक्षेचे फेर वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. पदवी परीक्षा ९ ऑक्टोबर पासून सुरु होणार असून २९ ऑक्टोबर पर्यंत चालणार आहेत. यामध्ये बी.ए, बी.एस्सी, बी.कॉम यासह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाचा समावेश आहे. यावर्षी पहिल्यांदाच बहुपर्यायी प्रश्नपत्रिका (एमसीक्यू) पध्दतीने परीक्षा घेण्यात येईल. ऑफलाईन तसेच ऑनलाईन पध्दतीने परीक्षा होणार असून कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर फिजिक्ल डिस्टन्सिंग ठेऊन परीक्षा घेण्यात येणार आहेत. याबाबत परीक्षा केद्रांनी पूर्ण जबाबदारीने काळजी घ्यावी यासाठी नियमावली करण्यात येणार आहे. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली नियमावली बनविण्यात येणार आहे. दरम्यान, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे परीक्षा वेळापत्रक सोमवारनंतर घोषित करण्यात येणार आहे. ‘नेट’सह विविध परीक्षा पुढील आठवड्यात होत असून त्याचा सर्व आढावा घेऊन हे वेळापत्रक घोषित करण्यात येईल, अशी माहिती परीक्षा विभागातर्फे देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *