औरंगाबाद: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रकुलगुरुपदी प्राचार्य डॉ.शाम शिरसाठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंग कोश्यारी यांनी ही नियुक्ती केल्याचे पत्र विद्यापीठास बुधवारी (दि.२८) प्राप्त झाले असून कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
मूळचे फुलंब्री (जि.औरंगाबाद) येथील रहिवासी असलेले डॉ.शाम शिरसाठ हे सध्या विवेकानंद महावि़द्यालयात प्राचार्यपदी कार्यरत आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या लोकप्रशासन विभागातून तीन वर्षापूर्वी प्राध्यापकपदावरुन त्यांनी धारणाधिकार (लिन) घेतला आहे. लोकप्रशासन अभ्यास मंडळाचे अध्यक्ष तसेच विद्या परिषदेचे सदस्य म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. डॉ.प्रविण वक्ते यांच्याकडून प्र कुलगुरुपदाची सूत्रे ते लवकरच स्वीकारणार आहेत. यापूर्वी डॉ.अशोक तेजनकर यांनी (२६ फेब्रुवारी २०१८ ते ३ जून २०१९ ) या दरम्यान काम पाहिले आहे. तर डॉ.प्रवीण वक्ते हे ६ ऑगस्ट २०१९ पासून प्रभारी प्र कुलगुरुपदावर कार्यरत आहेत.
‘एआयसीटीई’च्या अभ्यासक्रम समितीवर डॉ.रत्नदीप देशमुख
अखिल भारतीय तांत्रिक शिक्षा परिषदेच्या मार्फत अखिल भारतीय माहिती-तंत्रज्ञान शिक्षण मंडळाच्या अंतर्गत अभ्यासक्रम रचना समितीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संगणक शास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागातील वरिष्ठ प्रा.डॉ.रत्नदीप देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या समिती अंतर्गत एमसीए या ३ वर्षांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे पुनरावलोकन करणे व नव्याने २ वर्षाचा अखिल भारतीय स्तरावर प्रारुप आराखडा आणि तपशीलावर अभ्यासक्रम बनवण्यासाठी खालील सदस्यांची समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीचे संयोजक डॉ.भारत भास्कर, इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट रायपूर हे असणार आहेत. तसेच डॉ.सुदेष्णा सरकार, डॉ.मनिष अरोरा, प्रा.कर्मेषू, प्रा.रविंद्र वैद्य, प्रा.पी.व्ही.सुरेश व प्रा.उज्ज्वल लांजेवार, प्रा.डी.के. लोबियाल, प्रा.पी.एस. ग्रोवर व प्रा.एम.सुंदरसेन, प्रा.एस.सुरेश हे या समितीचे सदस्य आहेत.