# ई-संजीवनी ओपीडी; राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा कुठल्याही आजारावर घरबसल्या घ्या सल्ला.

 

मुंबई: कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात खासगी रुग्णालये बंद असल्यामुळे सामान्यांना वैद्यकीय सल्ला, आरोग्य तपासणीसाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सेवेचा महिन्याभरात १४०३ रुग्णांनी लाभ घेतला आहे. या सेवेसाठी मोबाईल ॲप तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून आठवडाभरात ते कार्यान्वित झाल्यानंतर या सेवेच्या माध्यमातून अधिकाधिक रुग्णांना लाभ घेता येऊ शकेल.  राज्यात एप्रिलमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू झालेली ही सेवा मे मध्ये पूर्णपणे सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी www.esanjeevaniopd.in या संकेतस्थळाला रुग्णांनी भेट देऊन तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले होते.

या ॲप्लीकेशनच्या माध्यमातून एखादा रुग्ण राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून कुठल्याही जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत संगणक, लॅपटॉप यांचा वापर करून कुठल्याही आजारावर सल्ला मसलत करू शकतो. यासेवेचे मोबाईल ॲप तयार झाल्यावर त्याचा सामान्यांकडून वापर अधिक प्रमाणात वाढेल. त्यावेळेस आवश्यकता भासल्यास डॉक्टरांची संख्या वाढविता येईल तसेच विशेषज्ञांच्या सेवांसाठी विशिष्ट वेळ देखील दिली जाईल, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.

केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचा या संयुक्त उपक्रमात ऑनलाईन ओपीडी सकाळी ९.३० ते दुपारी १.३० या काळात उपलब्ध असून त्यासाठी रुग्णाकडून शुल्क आकारले जात नाही. रविवारी ही सेवा उपलब्ध नसते.

राज्यातील विविध ठिकाणच्या जिल्हा रुग्णालयातील १६ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ऑनलाईन ओपीडी सेवेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. सध्या मुंबई, ठाणे, पुणे यासारख्या महानगरांमधून या ऑनलाईन ओपीडी सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

अशी आहे ई-संजीवनी ओपीडीची सेवा:
१) नोंदणी करून टोकन घेणे- मोबाईल क्रमांकद्वारे नोंदणी केल्यावर ‘ओटीपी’ येतो. त्या माध्यमातून रुग्ण नोंदणी अर्ज भरतो. त्यानंतर टोकनसाठी विनंती केल्यानंतर आजारासंबंधी काही कागदपत्रे, रिपोर्ट अपलोड केले जातात. त्यानंतर एसएमएसद्वारे रुग्णाला ओळखक्रमांक आणि टोकन क्रमांक प्राप्त होतो.
२) लॉगईनसाठी एसएमएसद्वारे नोटिफिकेशन येते. त्यानंतर रुग्णाला दिलेल्या ओळखक्रमांकाच्या आधारे लॉगईन करता येते.
३) वेटींग रुम- वेंटीग रुमवर एन्टर केल्यानंतर काही वेळातच ‘कॉल नाऊ’ हे बटन कार्यान्वित (ॲक्टीवेट) होते. त्यानंतर व्हिडीओ कॉलद्वारे डॉकटरांशी चर्चा केली जाते.
४) चर्चेनंतर लगेच ई-प्रिस्क्रीप्शन प्राप्त होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *