# संजय राऊत यांच्या पत्नीला ईडी चे समन्स; 29 रोजी उपस्थित राहण्याचे आदेश.

मुंबई: शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडी  (Enforcement Directorate) कडून समन्स बजावण्यात आले आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना समन्स बजावण्यात आल्याची माहिती आहे. त्यांना 29 डिसेंबर रोजी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते. की, प्रताप सरदेसाई, एकनाथ खडसे यांच्याप्रमाणेच आपल्यालाही कधीही ईडीचे समन्स येऊ शकते. दरम्यान, ईडीच्या नोटिशीबाबत संजय राऊत यांनी भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, सध्या मी मुंबईच्या बाहेर आहे. ईडीची नोटीस आल्याची कोणतीही माहिती आपल्याला नाही. नोटीस पाहिल्यानंतरच पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार असेही राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊत आक्रमक; आ देखे जरा किसमें कितना है दम…

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालयानालयाने (ईडी) नोटीस पाठवली आहे. या नोटिशीवर संजय राऊत यांनी ‘आ देखे जरा किसमें कितना है दम…’ असे ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे संजय राऊत ईडीच्या या कारवाईवर आक्रमक भूमिकेत दिसणार याचे स्पष्ट संकेतच राऊतांनी दिले आहेत.

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात चौकशी करत असलेल्या ईडीला वर्षा राऊत यांच्या खात्यावर काही प्रकारचे व्यवहार आढळून आल्यामुळे ही नोटीस बजावण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यांना मंगळवार, 29 डिसेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. आता या नोटिशीवर संजय राऊत यांची आक्रमक प्रतिक्रिया आली आहे.

आ देखे जरा किसमें कितना है दम, जमके रखना कदम मेरे साथिया, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. संजय राऊत यांनी ईडीच्या या कारवाईवर आक्रमक भूमिकेत दिसण्याचे संकेत देतानाच पत्नी वर्षा राऊत यांनाही न डगमगता ठाम राहण्याचा सल्लाही दिला आहे. त्यामुळे आता भाजपविरुद्ध शिवसेना असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

याआधी महाविकास आघाडीच्या नेत्यांना ईडीने समन्स पाठवल्यानंतर संजय राऊतांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. भाजपच्या विरोधात जाणाऱ्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावला जातो, असे राऊत म्हणाले होते. आता राऊतांच्या पत्नीलाच ईडीने नोटीस बजावल्यामुळे ते नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *