१० व्या अंबाजोगाई साहित्य संमेलन समारोपात ज्येष्ठ कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर यांचे आवाहन
अंबाजोगाई: मराठी भाषेचा संकर थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे आवाहन ज्येष्ठ कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर यांनी १० व्या अंबाजोगाई साहित्य संमेलन समारोप कार्यक्रमात केले.
मसाप अंबाजोगाई शाखेच्या वतीने टी. बी. गिरवलकर अभियांत्रिकी महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या सुर्यकांत गरुड व्यासपीठावर तीन दिवसीय साहित्य संमेलनाचा दिमाखदार समारोप झाला. या कार्यक्रमात डॉ. वृषाली किन्हाळकर प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. दासू वैद्य हे तर प्रमुख अतिथी म्हणून पहिल्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ लेखक प्रा. रंगनाथ तिवारी, पहिल्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. श्रीहरी नागरगोजे, संयोजक नानासाहेब गाठाळ, मसापचे अध्यक्ष दगडू लोमटे, सचिव गोरख शिंदे हे उपस्थित होते.
डॉ. वृषाली किन्हाळकर यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच हे साहित्य संमेलन अतिशय वेगळी कल्पना साकारत आहे आणि या साहित्य संमेलनात अनिवासी अंबाजोगाईकरांना सहभागी होण्याची एक उत्तम आणि उत्कट संधी या संमेलनानिमित्त उपलब्ध झाली. असे सांगून आपल्या भाषणाची सुरुवात त्यांनी “गावाची कविता” सादर करुन केली. डॉ किन्हाळकर पुढे म्हणाल्या की,अंबाजोगाई ने माझ्या अस्तित्वाला एक ठळक चेहरा आणि कर्तृत्ववान नवरा दिला असल्यामुळे मला अंबाजोगाईला कधीही विसरता येणार नाही. त्यांनी आपल्या भाषणात येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेतानाच्या, त्यावेळी अधिष्ठाता डॉ. व्यंकटराव डावळे आणि इतर शिक्षकांनी केलेल्या संस्कारांच्या, अंबाजोगाई शहरातील संस्कृतीच्या अनेक आठवणी सांगितल्या. अंबाजोगाईनं आयुष्य घडवण्यासाठी खूप काही गोष्टी दिल्या त्या विसरता येणं शक्य नाही असे त्यांनी सांगितले.
संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. दासू वैद्य यांच्या भाषणाचा उल्लेख करीत सामाजिक भाण तीव्र असणारे संवेदनशील कवी प्रा.डॉ. दासू वैद्य यांच भाषण सर्वांनी एकदा निवांत वाचलं पाहिजे असे डाॅ. किन्हाळकर म्हणाल्या. वैद्यकीय शिक्षण पूर्ण करुन मी जेव्हा वैद्यकीय व्यवसाय सुरू केला तेव्हा बाईच्या जगण्यालाच किंमत नाही तर मरणाला ही किंमत नाही हे मला समजलं आणि या वास्तव्याने मी व्यतीत होत गेले. बाईची दुःख समजावून घेतांना बाईच्या वेदनेशी समरस होतांना, तिच्या दुखण्यावर उपचार करतांना मग मी तिला औषधांची प्रिस्किप्शन लिहिता लिहिता कविता लिहायला शिकले. स्त्रीयांच्या विविध विषयांवर लिहिलेल्या या कवितांना अनेक पुरस्कार मिळाले अनेक ठिकाणी आपले गौरव झाले असे त्यांनी सांगितले.
डॉ. वृषाली किन्हाळकर यांनी संगणकावर आणि इतर ठिकाणी मराठी भाषेचा होणारा संकर थांबवता आला पाहिजे. मराठी भाषेची शुध्दता, अचुकता जपली पाहिजे. मराठी भाषेत इंग्रजी भाषेमुळे वापरात येणाऱ्या प्रत्येक शब्दाला पर्यायी शब्दाचा वापर आपल्याला करता आला पाहिजे असे सांगितले. असे झाले तरच मराठी भाषा जिवंत राहील असे त्यांनी सांगितले.
या साहित्य संमेलनाचा अध्यक्षीय समारोप करताना संमेलनाचे अध्यक्ष प्रा.डॉ. दासू वैद्य यांनी आपल्या भाषणात या साहित्य संमेलनामुळे चांगुलपणाचा रेटा तयार झाला आणि त्याला जोडून घेण्याची भावना प्रत्येक अनिवासी अंबाजोगाईकरांच्या मनात निर्माण झाली हे महत्त्वाचे आहे असं सांगत या तीन दिवसीय साहित्य संमेलनात बोललेल्या अनेक वक्त्यांची भाषणे आपण काळजीपूर्वक ऐकली आणि आपण ही सर्व भाषणे ऐकुण खूप प्रभावीत झालो. या संमेलनात सहभागी झालेल्या सर्व अनिवासी अंबाजोगाईकरांना आपल्या माहेरी आल्याचा फील येतो आहे हे महत्त्वाचे आहे असे सांगितले.

वृषाली किन्हाळकर या शारीरिक वेदनेचाच नाही तर मानसिक वेदनेचा विचार करणाऱ्या डॉक्टर: दासू वैद्य
डॉ. वृषाली किन्हाळकर यांचे भाषण ऐकत असतांनाच जगण्याच्या जवळ जाण्याची संधी मिळत असली तर डॉक्टर व्हायलाच पाहिजे असं सतत मला वाटतं होतं. डॉ. वृषाली किन्हाळकर या केवळ शारीरिक वेदनेचाच नाही तर मानसिक वेदनेचा विचार करणाऱ्या डॉक्टर आहेत असा गौरव ही त्यांनी केला. अंबाजोगाईत मॅड माणसांची खाण आहे. ही मॅड माणसं आपला मॅडनेस जपत साहित्य संमेलनाची माळ सतत जपत असतात. समाजात माणूसपण जिवंत ठेवायचं असेल तर अशी मॅडनेस माणसं वाढवली पाहिजेत, जपली पाहिजेत असे सांगितले.
या कार्यक्रमात संमलनाचे पहिले अध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी, वाहक अमर हबीब यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शिवाय संमेलना निमित्ताने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धाचे बक्षिस वितरण करण्यात आले. तर या संमेलनात घेण्यात आलेल्या 9 सत्रांचे संयोजक व संमेलन यशस्वीतेसाठी परीश्रम घेणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराबध्दल प्रा. रंगनाथ तिवारी व अमर हबीब यांनी विस्ताराने निवेदन करीत संमेलनाप्रति आपल्या भावना व्यक्त केल्या.
या कार्यक्रमात मसापचे अध्यक्ष दगडू लोमटे यांनी आपल्या प्रास्ताविकात मसाप शाखेच्या वतीने पुढील काळात शहरातील कथा लेखन विकसित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, पुढील संमेलनापासून शहरातील ज्येष्ठ साहित्यिकांना “गौरव पुरस्कार” रोख रक्कम १० हजार रोख, सन्मान चिन्ह देवून करण्यात येईल, मुकुंदराज यात्रे निमित्ताने भरवण्यात येणाऱ्या कवी संमेलनाची व्याप्ती वाढवण्यात येईल असे संकल्प जाहीर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मसापचे सचिव गोरख शेंद्रे यांनी केले तर आभार स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. बी. आय. खडकभावी यांनी मानले.