नवी दिल्लीः निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन आज उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता निवडणुका पुढे ढकलण्याच्या मागणीवर निवडणूक आयोगाकडून विचार केला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र निवडणूक आयोगाने आज या पाच राज्यांतील निवडणूक कार्यक्रम जाहीर करून या निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट केले. कोरोनाच्या नियमावलीचे पालन करूनच या निवडणुका घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
उत्तर प्रदेश आणि मणिपूर विधानसभेच्या निवडणुका टप्प्यांमध्ये होणार आहेत. तर पंजाब, गोवा आणि उत्तराखंड विधानसभेच्या निवडणुका एकाच टप्प्यात होणार आहेत. पाच राज्यांतील एकूण ६९० विधानसभा मतदारसंघात या निवडणुका होतील. त्यात उत्तर प्रदेशातील ४०३, पंजाबमधील ११७, उत्तराखंडमधील ७०, गोव्यातील ४० आणि मणिपूरमधील ६० विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. एकूण १८.३ कोटी मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात ८.५५ कोटी महिला मतदार आहेत. सर्व पाच राज्यांतील महिला मतदारांचे प्रमाण वाढले आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक २९ टक्के महिला मतदार वाढले आहेत.
कोविड सुरक्षित निवडणूक, मतदारांना कोणत्याही अडचणीविना मतदानाचा अनुभव आणि सर्वाधिक मतदानाची टक्केवारी ही आमची तीन प्रमुख उद्दिष्टे आहेत, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. एका मतदान केंद्रावर जास्तीत जास्त १,२५० मतदार असतील.
उत्तर प्रदेशात सात टप्प्यांत मतदानः उत्तर प्रदेशात सात टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान १० फेब्रुवारीला, दुसऱ्या टप्प्यातील मतदान १४ फेब्रुवारीला, तिसऱ्या टप्प्यातील मतदान २० फेब्रुवारीला, चौथ्या टप्प्यातील मतदान २३ फेब्रुवारीला, पाचव्या टप्प्यातील मतदान २७ फेब्रुवारीला, सहाव्या टप्प्यातील मतदान ३ मार्च रोजी तर सातव्या टप्प्यातील मतदान ७ मार्च रोजी होईल.
तीन राज्यांत एकाच दिवशी मतदानः उत्तराखंड, गोवा आणि पंजाबमध्ये १४ फेब्रुवारीला एकाच दिवशी मतदान होईल. मणिपूरमध्ये २७ फेब्रुवारी आणि ३ मार्चला मतदान होईल.
१५ जानेवारीपर्यंत रोडशो, पदयात्रा, सभांना बंदीः निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील निवडणुका जाहीर केल्या असल्या तरी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध लादले आहेत. १५ जानेवारीपर्यंत कोणत्याही प्रकारचा रोडशो, पदयात्रा, प्रचारसभा किंवा निवडणूक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास बंदी घालण्यात आल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी सांगितले. सार्वजनिक बैठकांना मात्र वेळेच्या निर्बंधासह परवानगी देण्यात आली आहे. डोअर टू डोअर प्रचाराची परवानगी असेल मात्र अशा टीममध्ये लोकांची संख्या मर्यादित असेल. डोअर टू डोअर प्रचारासाठी प्रत्येक टीममध्ये केवळ पाच लोकांनाच परवानगी असेल, असे चंद्रा म्हणाले.