गझल संमेलनस्थळ व परिसराला सुरेश भट, भाऊसाहेब पाटणकर , सतीश दराडे व भगवानराव लोमटे यांची नावे
अंबाजोगाई: अंबाजोगाईत दुसरे अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलन फेब्रुवारी महिन्याच्या एक आणि दोन तारखेला संपन्न होणार आहे या संमेलनासाठी महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून २५० पेक्षा अधिक गझलकार येणार आहेत. संमेलनाची तयारी चालू असून संमेलन स्थळांना दिवंगत गझल प्रेमी आणि गझलकरांची नावे देण्याचा निर्णय स्वागत समितीने घेतल्याची माहिती दगडू लोमटे यांनी दिली.
येत्या एक आणि दोन फेब्रुवारी रोजी अंबाजोगाई येथे अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलन होणार असून या संमेलन स्थळाला सुरेश भट गझल नगरी असे नाव देण्यात येणार आहे, प्रवेशद्वाराला मराठी शायर भाऊसाहेब पाटणकर यांचे नाव देण्यात येणार आहे व्यासपीठाला सतीश दराडे स्मृती मंच असे नाव दिले जाणार आहे व ग्रंथ प्रदर्शनाला भगवानराव लोमटे यांचे नाव देण्यात येणार आहे.
योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या योगेश्वरी महाविद्यालयाच्या नागापूरकर सभागृहात हे संमेलन होणार असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून ३०० पेक्षा अधिक गझलकार व रसिक येणार आहेत. त्यांच्या निवास, भोजन याची व्यवस्था केली जाणार आहे. संमेलन यशस्वी करण्यासाठी जय्यत तयारी असून स्वागत समितीने अनेक गोष्टींचा विचार करून अनेक समित्या नेमल्या आहेत. या संमेलनामध्ये एकूण वीस सत्र होणार असून त्यामध्ये १७ मुशायरे होणार आहेत. त्यात एक मुशायरा उर्दूचा होणार आहे. ज्यात मातृभाषा उर्दू असलेले ५ गझलकार व मराठी मातृभाषा असलेले व नंतर उर्दू भाषा व लिपी शिकून उर्दू गझल लिहिणारे ७ गझलकार असतील. तरन्नुम गायकीने गझल सादर करणारा एक मुशायरा असणार आहे.
प्रत्येक सत्राला दिवंगत गझकारांची नावे देण्यात येणार आहेत. त्यात सतीश दराडे, राम मुकदम, कमलाकर आबा देसले, अरुणोदय भाटकर, मनोहर रणपिसे, इलाही जमादार, अनिल कांबळे, मधुसूदन नानिवडेकर, बशर नवाज, प्रकाश मोरे, व्यंकटराव देशमुख, विनिता कुलकर्णी पाटील, नाना बेरगुडे, सुप्रिया जाधव, उ. रा. गिरी, लक्ष्मण जेवणे, गिरीश खारकर, बदीउज्जमा खावर यांचा समावेश आहे. अशीही माहिती दगडू लोमटे यांनी दिली. बैठकीस स्वागत समितीचे कार्याध्यक्ष डॉ. शुभदा लोहिया, सचिव गोरख शेंद्रे, उपाध्यक्ष निशा चौसाळकर, डॉ. नरेंद्र काळे, प्रा. डॉ. शैलजा बरूरे, तिलोत्तमा पतकराव, संतोष मोहिते, कोषाध्यक्ष सुनील जाधव व इतर स्वागत सदस्य हजर होते.