# सक्षम देश घडविण्यासाठी युवांचे सक्षमीकरण आवश्यक -राष्ट्रपती राम नाथ कोविंद.

74 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण

नवी दिल्ली: 

माझ्या प्रिय देशबांधवांनो,

नमस्कार !

1.  देशाच्या 74 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सर्व देशवासियांना आणि देशाबाहेर असलेल्या सर्व भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देतांना मला अत्यंत आनंद होत आहे. 15 ऑगस्ट या दिवशी झेंडावंदन करणे, स्वातंत्र्यदिन सोहळ्यात सहभागी होणे आणि देशभक्तीपर गीते ऐकणे या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी नवे चैतन्य घेऊन येणाऱ्या असतात. यादिवशी, देशातील युवकांना, आपण स्वतंत्र भारताचे नागरिक असल्याबद्दल विशेष अभिमान वाटायला हवा. ज्यांच्या बलिदानामुळे आज  आपण स्वतंत्र भारतात मुक्तपणे राहू शकतो आहोत, अशा सर्व स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्म्यांचे आज आपण कृतज्ञ स्मरण करतो.

2. आपल्या स्वातंत्र्यलढ्याच्या मूल्यांनी आधुनिक भारताचा भक्कम पाया रचला आहे. आपल्या द्रष्ट्या नेत्यांनी बहुविध विचार एकत्र करुन, देशात राष्ट्रीयत्वाची समान उर्जा निर्माण केली. जुलमी दडपशाहीच्या परदेशी राजवटीतून भारतमातेला स्वतंत्र करण्याच्या आणि तिच्या सुपुत्रांचेभविष्य उज्ज्वल करण्याच्या उद्दिष्टासाठी ते सर्व कटिबद्ध होते. त्यांच्या विचार आणि कार्यानेच, जगात एक  आधुनिक देश म्हणून  भारताची ओळख निर्माण झाली आहे.

3.   आपण अत्यंत नशीबवान आहोत की महात्मा गांधी या स्वातंत्र्यलढयाचे दीपस्तंभ म्हणून आपल्याला लाभले. राजकीय नेत्याबरोबरच एक संत असलेले महात्मा गांधी हे एक लोकोत्तर व्यक्तिमत्व होते, जे केवळ भारतातच घडू शकतात. आज सामाजिक कलह, आर्थिक समस्या आणि हवामान बदल अशा प्रश्नांमुळे त्रस्त झालेल्या जगासाठी महात्मा गांधींची शिकवण हा एक मोठा दिलासा आहे. न्याय आणि समानतेसाठीचा त्यांचा आग्रह हा आपल्या प्रजासत्ताकासाठीचा मंत्र ठरला आहे. आजची नवी पिढी महात्मा गांधींचा नव्याने शोध घेत आहे, हे पाहून मला अत्यंत आनंद होत आहे.

माझ्या प्रिय देशवासीयांनो,

4.   यंदाच्या स्वातंत्र्यदिनाचे सोहळे मर्यादित स्वरुपात होणार आहेत. कारण आपल्याला माहितीच आहे. सध्या संपूर्ण जग एका अत्यंत धोकादायक विषाणूचा सामना करत आहे, या विषाणूने आपले जीवनमान विस्कळीत केले आहे, आणि त्याची जबर किंमत सर्वांनाच मोजावी लागते आहे. या विषाणूमुळे, आपले कोरोना साथीच्या पूर्वी असलेले जग बदलून गेले आहे.

5.   या अत्यंत मोठ्या आव्हानाचा पूर्व अंदाज घेत, केंद्र सरकारने योग्य वेळी अनेक प्रभावी पावले उचलली ही बाब अत्यंत दिलासादायक आहे. भारतासारख्या इतक्या विशाल आणि वैविध्यपूर्ण, तसेच लोकसंख्येची घनता असलेल्या देशात, अशा आव्हानाचा सामना करण्यासाठी असामान्य प्रयत्नांची गरज आहे. सर्व राज्य सरकारांनी आपापल्या स्थानिक परिस्थितीनुसार आवश्यक त्या उपाययोजना केल्या. लोकांनीही सरकारच्या प्रयत्नांना पूर्ण सहकार्य केले. आपल्या कटिबद्ध प्रयत्नांमुळे, आपण या जागतिक साथीच्या आजाराचा प्रभाव आटोक्यात आणण्यात आणि अनेकांचे प्राण वाचवण्यात यशस्वी ठरलो आहोत, ही जगासाठी देखील अनुकरणीय बाब आहे.

6.   या विषाणूविरुद्धच्या आपल्या लढ्यात पहिल्या फळीत राहून अविश्रांत कष्ट करणारे आपले डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचारी यांचा देश ऋणी आहे. दुर्दैवाने, या महामारीशी लढतांना त्यांच्यापैकी कित्येकांना आपले जीव गमवावे लागले. ते आपल्या देशाचे नायक आहेत. हे सर्व कोरोनायोद्धे मोठ्या कौतुकास पात्र  आहेत. त्यांनी आपल्या कर्तव्याच्या कितीतरी पलीकडे जात लोकांचे जीव वाचवण्यासाठी आणि लोकांपर्यंत अत्यावश्यक सेवा पोहोचवण्यासाठी अविरत कष्ट केले. हे डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन पथकांतील सदस्य, पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी, विविध सेवा पुरवठा करणारे लोक, वाहतूक करणारे लोक, रेल्वे आणि विमान वाहतूक कर्मचारी, सरकारी कर्मचारी, समाजसेवी संस्था आणि सुहृद नागरिकांनी या संकट काळात केलेल्या निस्वार्थ आणि साहसी सेवा कार्याच्या गाथा अत्यंत प्रेरणादायी आहेत. जेव्हा शहरे आणि गावे शांत असतात आणि रस्ते ओसाड पडतात, अशावेळी हे लोक अविश्रांत काम करुन कोणीही आरोग्य सुविधा आणि सेवेपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतात. पाणी आणि वीज, वाहतूक आणि संपर्क व्यवस्था, दूध आणि भाज्या, अन्न आणि वाणसामान, औषधे आणि इतर आवश्यक वस्तू लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतात. आपले जीवन आणि जीवनमान सुरक्षित ठेवण्यासाठी ते स्वतःचे जीव धोक्यात घालतात.

7. याच संकटकाळात पश्चिम बंगाल आणि ओदिशाच्या किनारपट्टीवर  अम्फान चक्रीवादळाने धडक दिली. आपत्ती व्यवस्थापन पथक, केंद्र आणि राज्यातील विविध यंत्रणा आणि दक्ष नागरिकांनी केलेल्या एकत्रित प्रयत्नांमुळे कमीतकमी जीवित हानी झाली. ईशान्य भारत आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये सध्या आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.  अशा आपत्तींच्या हल्ल्याच्या वेळी समाजातील सर्व घटक एकत्र येऊन आपत्ती ग्रस्तांना सर्वतोपरी मदत करतात, ही अतिशय समाधानाची बाब आहे.

माझ्या प्रिय देशबांधवानो,

8.   या आजाराचा सर्वात मोठा फटका गरीब आणि रोजंदारीवर जगणाऱ्या लोकांना बसला आहे. या संकटकाळात या सर्वांना आधार देण्यासाठी, विषाणू प्रतिबंधक उपाययोजनांसह, सरकारने काही कल्याणकरी उपक्रमही हाती घेतले आहेत. ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची’ घोषणा करत, केंद्र सरकारने कोट्यवधी लोकांची उपजीविका चालेल अशी व्यवस्था करत बेरोजगारीचे संकट आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. सरकारने इतर अनेक उपक्रमातून या घटकांना मदतीचा हात दिला. सरकारच्या या प्रयत्नांना कॉर्पोरेट क्षेत्र, नागरी समाज आणि नागरिकांचाही मोठा हातभार लागला.

9.  गरजूंना मोफत अन्नधान्य वितरीत केले जात आहे, जेणेकरुन कोणतेही कुटुंब उपाशी राहणार नाही. जगातील सर्वात मोठ्या मोफत अन्नवाटप योजनेला  आता नोव्हेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ मिळाली असून दरमहा 80 कोटी लोकांना या योजनेचा लाभ मिळतो आहे. शिधापत्रिकाधारक स्थलांतरित मजुरांना देशात कुठेही स्वस्त धान्य उपलब्ध व्हावे, यासाठी सर्व राज्यांना ‘एक देश-एक शिधापत्रिका’ योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात येत आहे.

10. जगभरात विविध ठिकाणी अडकलेल्या आपल्या सर्व नागरिकांची काळजी घेत सरकारने “वंदे भारत’ अभियानाअंतर्गत आतापर्यंत 10 लाख भारतीयांना मायदेशी परत आणले आहे. भारतीय रेल्वे देखील, या आव्हानात्मक परिस्थितीत लोकांना वाहतूक सेवा आणि मालवाहतूक सेवा देत आहे.

11.  आपल्या शक्तींच्या जोरावर, आपण कोविड-19 च्या या लढ्यात इतर देशांचीही मदत केली. औषधांचा पुरवठा करण्याविषयी इतर देशांनी केलेल्या विनंतीला प्रतिसाद देत, भारताने पुन्हा एकदा सिध्द केले की अशा संकटकाळात, भारत जागतिक समुदायासोबत खंबीरपणे उभा आहे. या आजाराचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी जागतिक आणि प्रादेशिक पातळीवर जी धोरणे आखली गेली, त्यातही आपला पुढाकार होता. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यत्वासाठी भारताला विविध देशांकडून मिळालेला अभूतपूर्व पाठींबा म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची पत दर्शवणारा दाखलाच आहे.

12. भारताची ही परंपरा आहे की आपण केवळ स्वतःसाठी जगत नाही, तर संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी कष्ट करतो. भारतासाठी आत्मनिर्भर होण्याचा अर्थ म्हणजे, इतर जगापासून विलग न होता किंवा अंतर न राखता, स्वयंपूर्ण होणे. भारत आता आपले वेगळे अस्तित्व कायम राखत, संपूर्ण जगाशी व्यवहार करेल, असे यात  अभिप्रेत आहे.

माझ्या प्रिय देशबांधवांनो,

13 आपल्या ऋषीमुनींनी जे अनेक वर्षांपूर्वी सांगितले होते,ते, म्हणजे संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे, “वसुधैव कुटुंबकम” हे तत्वज्ञान जगाला आज समजले आहे. मात्र, जेव्हा संपूर्ण जागतिक समुदाय आज मानवतेपुढच्या या सर्वात मोठ्या आव्हानाचा सामना करण्यासाठी एकत्र आला आहे, अशा वेळी देखील, आपल्या काही शेजारी देशांनी विस्तारवादाचे  दुःसाहस करण्याचा प्रयत्न  केला. आपल्या सीमांचे रक्षण करतांना आपल्या वीर जव%