मुंबई: राज्याचे ऊर्जामंत्री व काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांना कोरोनाची लागण झाली आहे. राऊत यांनी स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली आहे. ‘माझा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी खबरदारी म्हणून स्वत:ची कोविड तपासणी करून घ्यावी,’ असं आवाहन त्यांनी केलं आहे. ‘सर्वांनी काळजी घ्यावी आणि सुरक्षित राहावे,’ असंही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
राज्यातील अनेक मंत्र्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, अस्लम शेख यांनाही कोरोनाची बाधा झाली होती. या सर्वांनी कोरोनावर मात केली आहे. नितीन राऊत हे देखील कोरोनावर मात करून पुन्हा सक्रिय होतील, अशी अपेक्षा त्यांचे निकटवर्तीय व चाहत्यांनी व्यक्त केली आहे.