पुणे: पुण्याच्या प्रधान नियंत्रक संरक्षण लेखा कार्यालयाच्या पीसीडीए (ओ) परिसरात गुरूवार, 22 ऑक्टोबर रोजी ‘टी-55 टँक या युद्धस्मारकाची स्थापना करण्यात आली. लष्करी युद्ध स्मारक- ‘टी-55 टँक चे, दिल्लीहून IDAS प्रधान नियंत्रक संरक्षण लेखा कार्यालय, संजीव मित्तल यांच्या हस्ते, आभासी स्वरूपात उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ निरुपमा काजला, मयंक शर्मा, मिहीर कुमार आदी उपस्थित होते.
केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या (वित्त) अखत्यारीतील संरक्षण लेखा विभाग या संस्थेचे PCDA (O) म्हणजेच प्रधान नियंत्रक संरक्षण लेखा कार्यालय ही पथदर्शी संघटना आहे. या संघटनेकडे भारतीय लष्करातील 53,000 पेक्षा अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते देणे तसेच, पूर्व लेखा परीक्षण ही सर्व जबाबदारी असते.
यावेळी संरक्षण लेखा विभागाचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक संजीव मित्तल म्हणाले, की PCDA (O) च्या कार्यालय परिसरात ‘टी-55 टँक या युद्धस्मारकाची स्थापना होणे, हे लष्कर आणि संरक्षण लेखा विभागातील एकात्मीकृत भावनेचे प्रतीक आहे. लष्कराने दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडतांना संरक्षण लेखा विभाग दाखवत असलेली कार्यक्षमता आणि व्यावसायिक भावनेचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी डॉ.निरुपमा काजला यांनी लष्करी अधिकाऱ्यांचे आभार मानले आणि लष्करी अधिकाऱ्यांना दर्जेदार सेवा देण्यासाठी PCDA(O) कार्यालय सदैव तत्पर आणि कटिबद्ध असेल, अशी ग्वाही दिली. PCDA(O) च्या कार्यालयात, टी-55 टँक या युद्धस्मारकाची स्थापना होणे हे ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. हे स्मारक आम्हाला सदैव प्रेरणा देत राहील आणि आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रोत्साहित करेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.