कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्यासह १६ सदस्यांचा समावेश
औरंगाबाद: नवीन शैक्षणिक धोरणाबाबत अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने ‘टास्क फोर्स‘ स्थापन केला आहे. उच्च शिक्षणाच्या अनुषंगाने हा ‘टास्क फोर्स‘ स्थापन करण्यात आला असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्यासह उच्च व तंत्रशिक्षण विभागातील अधिकारी यांचा सहभाग असलेली समिती तीन महिन्यांत राज्य सरकारला आपला अहवाल सादर करणार आहे.
केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरण लागू केले. राज्य सरकार ते धोरण यंदा लागू करणार नाही हे यापूर्वीच अनेक मंत्र्यांनी स्पष्ट कले होते. त्या धोरणांचा राज्य सरकार अभ्यास करीत आहे. त्याचाच भाग म्हणून ‘टास्क फोर्स’ तयार करण्यात आला आहे. यामध्ये १६ सदस्यांचा समावेश असून त्यात विविध विद्यापीठाचे कुलगुरु, प्राध्यापक, अधिकारी यांचा सहभाग आहे. विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक कौशल्य, विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण आणि औद्यौगिक क्षेत्रातील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी हे धोरण असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात येत आहे. त्याबाबत राज्य शासनाकडून सूचना व अभिप्राय मागविण्यात आल्या आहेत.
धोरणाच्या मुसद्याबाबत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान, उच्च शिक्षण संचालक कार्यालयाने यापूर्वी अहवाल सादर केला आहे. असे असले तरी धोरणासंदर्भात अभ्यास करुन राज्य शासनास अहवाल सादर करण्यासाठी नव्याने ‘टास्क फोर्स‘ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या माजी कुलगुरु डॉ.वसुधा कामत अध्यक्षस्थानी आहेत. त्यांच्यासह विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ.सुखदेव थोरात, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सुहास पेडणेकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले, ‘आयसीटी’चे माजी कुलगुरु डॉ. जी.डी. यादव आदी १६ जणांचा समावेश आहे. समितीने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील प्रत्येक मुद्याचा अभ्यास करुन आपल्या अहवाल तीन महिन्यांत सादर करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. काही तातडीच्या मुद्यांबातत बैठका घेऊन अंतरीम अहवाल सादर करावा, असेही सरकारने यासंदर्भात अध्यादेशात म्हटले आहे.
दरम्यान, कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांचे प्र-कुलगुरु डॉ.प्रवीण वक्ते, कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी यांनी अभिनंदन केले. तर शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेतर्फे राज्य उपाध्यक्ष डॉ. कैलास पाथ्रीकर, पर्वत कासुरे, अनील खामगांवकर, प्रकाश आकडे, जीवन डोंगरे आदी उपस्थित होते.