जळगाव: भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी खासदार हरिभाऊ जावळे (वय67) यांचे मुंबईत उपचार सुरु असताना आज दुपारी निधन झाले. मागील काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्याने मुंबईतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.
हरिभाऊ जावळे यांचा जन्म यावल तालुक्यातील भालोद येथे 1 जून 1953 मध्ये झाला होता. त्यांनी जनसंघात काम केले होते. 1999 ते 2004 मध्ये ते यावल मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले होते. तसेच 2003 मध्ये झालेल्या जळगाव लोकसभेच्या पोटनिवडणुकीत निवडून आले होते. त्यानंतर 2009 मध्ये त्यांनी रावेर लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. पुन्हा 2014 मध्ये ते यावल विधानसभा मतदार संघातून निवडून आले होते. हरिभाऊ जावळे यांनी सहकार क्षेत्रातही भरीव कामगिरी केली असून, मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून त्यांनी काम केले आहे. जिल्ह्यात केळी प्रक्रिया उद्योगासाठीही त्यांनी भरीव कामगिरी केली आहे.