पुणे: बंगालच्या उपसागराह अरबी समुद्रात पाऊस पडण्यासाठी आवश्यक असलेली स्थिती थांबली आहे. परिणामी गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात सर्वदूर सुरू असलेल्या मुसळधार पावसाची गती मंदावली आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसात मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तर कोकणात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.
राज्यातील कोकणासह मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मान्सूनचे आगमन होताच सलग मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे सर्वदूर पाऊस कोसळत होता. मान्सूनने महाराष्ट्र व्यापल्यानंतर पोषक स्थितीमुळे आगेकूच सुरू झाली. गुजरात, मध्यप्रदेश मार्गे मान्सून झारखंड, बिहार, भाग व्यापून सध्या उत्तर प्रदेशकडे रवाना झाला आहे. तर ईशान्य भागातील सर्व राज्य मान्सूनने व्यापली आहेत. मात्र, सध्या मान्सून पुढे सरकण्यासाठी पोषक स्थिती सध्या नसल्यामुळे मान्सूनची आगेकूच मंदावली आहे.