मनोविकास लाईव्हमध्ये कांबळे यांनी घडवलं ग्रंथांनी घडवलेल्या माणसाचं दर्शन
पुणे: ‘पत्रकारिता हे एक असं सत्तासाधन आहे, असं शस्त्र आहे ज्याच्या आधारे पत्रकार समाजात मोठा बदल घडवून आणू शकतो. त्यासाठी आतून-बाहेरून सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचं ध्येय, दृष्टिकोन बाळगत पत्रकारिता करण्याची गरज आहे. आज हा विचार फारसा दिसत नाही. किंबहुना काही करता येत नाही म्हणून पत्रकारिता करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. म्हणून आजच्या पत्रकारितेचा फारसा प्रभाव समाजात पडलेला दिसत नाही. वास्तविक पाहाता पत्रकारितेची सुरूवात सामाजिक बदलांच्या आग्रहातून झालेली आहे. सतीप्रथा बंद झाली पाहिजे, जातीव्यवस्था नष्ठ झाली पाहिजे, अंधश्रद्धांमधून समाजाची मुक्तता केली गेली पाहिजे असे सारे विषय पत्रकारितेनेच ऐरणीवर आणले आणि त्यातून त्या त्या क्षेत्रातल्या चळवळी उभ्या राहिल्या. म्हणून आपल्या पत्रकारितेमागे सामाजिक बदल हे कारण असलंच पाहिजे’ असं मत व्यक्त करत ज्येष्ठ पत्रकार आणि सुप्रसिद्ध साहित्यिक उत्तम कांबळे यांनी पुस्तकांनी घडवलेला माणूस आणि त्याने घडवून आणलेले सामाजिक बदल याचं मोहून टाकणारं दर्शन घडवलं.
निमित्त होतं रविवारी मनोविकास प्रकाशनाने आयोजित केलेल्या फेसबुक लाईव्ह संवादाचं. ग्रंथानी घडवलेला माणूस उत्तम कांबळे यांच्याशी मुक्त संवाद असं स्वरुप असलेल्या या कार्यक्रमात नाशिक सकाळचे संपादक श्रीमंत माने यांनी त्यांना बोलतं केलं, तर मनोविकास लाईव्हच्या या सातव्या भागाचं प्रास्ताविक मनोविकास प्रकाशनाचे संपादक विलास पाटील यांनी केलं.
या संवादात उत्तम कांबळे यांनी प्रतिकूल परिस्थितीशी द्यावा लागलेला झगडा, त्यात ग्रंथानी दिलेला आधार, पत्रकारितेत केलेले नाविन्यपूर्ण प्रयोग आणि त्यातून साधलेला सामाजिक बदल याविषयी अत्यंत मोकळेपणाने मांडणी केली. ते पत्रकारितेविषयी बोलताना म्हणाले,
‘कोल्हापुरातून मी माझ्या पत्रकारितेला सुरूवात केली. तेव्हा तिथल्या सर्व बुवांना संपवण्याचं काम मी हाती घेतलं. कारण अंधश्रद्धेत अडकलेला समाज मी पाहात होतो. …आणि इथंच मला समजलं की, पत्रकारिता हे पोट भरण्याचं साधन नाही. ते समाज बदलाचं शस्त्र आहे. पण त्यासाठी त्याचा नेमकेपणाने वापर केला गेला पाहिजे. आजवरच्या समाज परिवर्तनाच्या साऱ्या चळवळी लक्षात घेतल्या तर आपल्या लक्षात येईल की, आजच्या पत्रकारितेचा तो इतिहास आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी मुकनायक सुरू केलं त्यामागची भूमिका बघा. त्यांनी पहिल्याच अंकाच्या संपादकीयमध्ये ती मांडली आहे. ते लिहितात, माझ्यावर समाजाचं जे प्रचंड ऋण झालेलं आहे त्यातून उतराई होण्यासाठी मी पत्रकारितेत आलेलो आहे. म्हणजे कारण काय तर समाज बदल. या बदलासाठी वरवरची पत्रकारिता उपयोगी ठरत नाही. त्यासाठी मुळापर्यंत जावं लागतं. मी जायचो. त्यातूनच देवदासींच्या आयुष्यात आनंद निर्माण करता आला. अंधश्रद्धेतून अनेकांना मुक्त करता आलं. कित्येकांना मदत मिळवून देता आली.’
प्रतिकूल परिस्थितीशी झगडताना आणि त्यातून शहाणपण मिळवत आपलं आयुष्य समृद्ध बनवताना जो अनुभव गाठीशी येतो तो माणसाला माणूस म्हणून घडवतो, याचा वास्तूपाठच उत्तम कांबळे यांनी या संवादातून वाचकांसमोर मांडला. कोल्हापूर सकाळमध्ये पत्रकार म्हणून काम करत असताना नग्नपुजेसंदर्भातली एक बातमी त्यांच्या वाचनात आली आणि ते अगदी हट्टाने तो सोहळा कव्हर करायचा म्हणून कर्नाटकातल्या चंद्रगुत्तीला गेले. हजारो बायका एकत्र येत नग्नपणे देवीची पूजा करण्याची एक प्रथा तिथल्या जत्रेत होती. अगदी मार खावून त्यांनी ती जत्रा कव्हर केली आणि त्यावर वयाच्या तेवीसाव्या वर्षी सकाळमध्ये अग्रलेख लिहून या अंधश्रद्धेवर जोरदार प्रहार केला. त्याची दखल घेत त्यावेळच्या हेगडे सरकारने ही प्रथा कायमची बंद केली. यापद्धतीने विषयाला भिडत सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी पत्रकारिता केली पाहिजे असं सांगत त्यांनी विविध विषयांवरील पुस्तकांचं वाचण सर्वांनीच केलं पाहिजे. कारण वाचणातून माणूस घडतो. किंबहुना ज्याला व्यवस्थेने इतिहास दिलेला नसतो, भूगोल दिलेला नसतो, चालण्यासाठी चांगला वर्तमानही दिलेला नसतो, अशा माणसांना ग्रंथ खूप उपयोगी पडतात असा माझा अनुभव आहे, असं प्रतिपादन या संवादादरम्यान केलं.