पुणे: विमाननगर परिसरातील संजय पार्क सोसायटीतील बंगल्यातून एकूण 87 कोटी 5 लाख 75 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी खंडणी व अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक नीलेशकुमार महाडिक यांनी फिर्याद दिली असून, विमानतळ पोलिस ठाण्यात सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील नितीन कोंघे यांनी केली. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. के. खान यांनी आरोपींची 15 जूनपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींचे मोठे रॅकेट असून, लष्करातील लान्सनायक हा मुख्य सूत्रधार आहे. दरम्यान, चलनाचा वापर आरोपींनी फसवणुकीसाठी केला असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. तसेच त्यांनी या नोटा मुंबईतील भेंडी बाजारातून आणल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जप्त करण्यात आलेली रक्कम ही मोठ्या प्रमाणात असल्याने रात्री उशिरापर्यंत तिची मोजणी सुरू होती. यातील आरोपी शेख अलीम समद गुलाब खान (वय 36, रा.जेडीसी पार्क, प्रतीकनगर, येरवडा) हा लान्सनायक असून, तो संरक्षण दलातील बॉम्बे इंजीनियरिंग ग्रुप खडकी येथे कार्यरत आहे. त्याच्यासह सुनील बद्रीनारायण सारडा (वय 40), अब्दूल गणी रहेमत्तुल्ला खान (वय43), अब्दुल रहेमान अब्दुलगणी खान (वय18), रितेश रत्नाकर (वय34) आणि तुफेल अहमद महंमद इसाक खान (वय28) यांना अटक करण्यात आली आहे.
लष्कराची गुप्तचर यंत्रणा आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही रक्कम, पाच मोबाइल, रोख दोन लाख 89 हजार रुपये, एक हजार 200 अमेरिकन डॉलर, चलनातून बाद झालेल्या एक हजार रुपयांच्या 13 नोटा, एक कार आणि इतर साहित्य जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या चलनामध्ये दोन हजार, एक हजार, पाचशे रुपयांच्या नोटा आहेत. त्यांच्यावर ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’ असे नमूद आहे. नोटा ठेवण्यात आल्या होत्या. त्या बंगल्याच्या मालकाचा पोलिस शोध घेत आहेत. याप्रकरणी अधिक तपास गुन्हे शाखा युनिट चारचे पोलिस निरीक्षक अंजुम बागवान करीत आहेत.
काळा पैसेवाले व हवालाचा व्यवहार करणारे आरोपींचे टार्गेट: काळा पैसा व हवाला करणारे आरोपींचे टार्गेट होते. आरोपींनी स्वस्तात चलन देण्याचे आमिष दाखवणारे व्हिडीओ तयार केल्याची माहिती मिळाली आहे. हे व्हिडिओ ज्यांच्याकडे काळा पैसा आहे किंवा हवाला व्यवहार करणाऱ्यांना पाठवण्यात येणार होता. खोट्या नोटांच्या बंडलला खऱ्या नोटा लावून त्याद्वारे फसवणूक करण्यात येणार होती. त्यांनी काही लोकांची फसवणूक देखील केली असल्याचे समोर आले आहे.