कार्याध्यक्षपदी किशोर आगळे; प्रदेश प्रतिनिधीपदी अब्दुल हाफिज
जालना: मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न जालना जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी फकीरा देशमुख, कार्याध्यक्षपदी किशोर आगळे आणि सरचिटणीसपदी नारायण माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर प्रदेश प्रतिनिधी म्हणून अब्दुल हाफिज यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष तथा निवडणूक निरीक्षक प्राचार्य सुरेश नाईकवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी जालना जिल्ह्यातील पत्रकारांची बैठक पार पडली. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या आदेशानुसार जालना जिल्हा मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी बिनविरोध जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीमध्ये जिल्हाध्यक्षपदी फकीरा देशमुख, कार्याध्यक्षपदी किशोर आगळे, सरचिटणीसपदी नारायण माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, मराठी पत्रकार परिषदेचे प्रदेश प्रतिनिधी म्हणून अब्दुल हाफिज यांची यावेळी नियुक्ती करण्यात आली आहे.
उर्वरित जिल्हा कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष- अभयकुमार यादव, दिनेश जोशी, चिटणीस शेख मुसा, कोषाध्यक्ष धनसिंह सूर्यवंशी, कार्यकारिणी सदस्य मोहन मुळे (जाफराबाद), गणेश औटी (भोकरदन), अशोक शहा (अंबड), राजकुमार भारूका (परतूर), सर्जेराव गिऱ्हे (घनसावंगी), धनंजय देशमुख (जालना), संतोष सारडा( बदनापूर) यांचा समावेश आहे.
यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष तथा निवडणूक निरीक्षक प्राचार्य सुरेश नाईकवाडे यांनी पत्रकारांना मार्गदर्शन केले. पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी मराठी पत्रकार परिषद ही राज्यातील पत्रकारांची मातृसंस्था आहे. मराठी पत्रकार परिषदेने लढा उभारल्यामुळे पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकार पेन्शन योजना हे महत्वाचे प्रश्न मार्गी लागले आहेत. असे असले तरी पत्रकार पेन्शन योजनेतील काही जाचक अटी दूर करण्यासाठी आणि सर्वस्तरातील पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका देण्यात याव्यात, या आणि अन्य प्रमुख मागण्यासाठी पत्रकार परिषदेच्या वतीने व्यापक लढा उभारण्यात येत आहे. पत्रकारांना न्याय मिळेपर्यंत हा लढा असाच कायम सुरू राहील, असे नाईकवाडे यांनी सांगितले.
यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष तथा निवडणूक निरीक्षक सुरेश नाईकवाडे आणि मराठवाडा सचिव विशाल सोळंके यांनी जालना जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे देऊन त्यांचे स्वागत करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रस्ताविक माजी अध्यक्ष अब्दुल हाफिज यांनी केले. सूत्रसंचालन किशोर आगळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार फकीरा देशमुख यांनी मानले.