पुणे: शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या शीर्षकांतर्गत बियाणे या घटकाचा लाभ घेण्यासाठी दिनांक १५ मे २०२१ पर्यंत अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी. बी. बोटे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
या सुविधेंतर्गत लाभार्थींनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजनेतील सोया, भात, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी इत्यादी अनुदानावर बियाणे उपलब्ध होणार असून पोर्टलद्वारे अर्ज करणे शेतक-यांना बंधनकारक आहे. शेतक-यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीद्वारे शेतक-यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून शेतक-यांनी शेती निगडीत विविध बाबींकरिता अर्ज करावयाचा आहे.
महा-डीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ आहे. यावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वत:च्या मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र, ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इत्यादी माध्यमातून वरील संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकतील. ‘वैयक्तिक लाभार्थी’ म्हणून नोंदणी करु इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक या संकेतस्थळावर प्रमाणित करुन घ्यावा लागेल. ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन नोंदणी करावी व तो नोंदणी क्रमांक पोर्टलमध्ये नमूद करुन त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल. अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी पोर्टलमध्ये त्यांना आधार क्रमांक नोंदणीकृत करुन प्रमाणित करुन घ्यावा लागेल, त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही. शेतकरी या कामासाठी आपल्या जवळच्या सामूहिक सेवा केंद्राची मदत घेऊ शकतात तसेच कोणतीही तांत्रिक अडचण असल्यास helpdeskdbtfarmer@gmail.com या ई-मेल व किंवा ०२०-२५५११४७९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे यांनी केले आहे.