नवी दिल्ली: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 1 जानेवारी 2021 पर्यंत सर्व मोटार वाहनांना (चारचाकी) फास्टॅग लावणे अनिवार्य केले आहे. यासंदर्भात मंत्रालयाने सीएमव्हीआर, 1989 च्या नियमामध्ये दुरूस्ती करण्यात आल्याची अधिसूचना जारी केली आहे. यानुसार ज्या वाहनांची विक्री 1 डिसेंबर 2017 पूर्वी करण्यात आली आहे, अशा जुन्या एम आणि एन श्रेणीतल्या वाहनांवरही फास्टॅग बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. मंत्रालयाने जीएसआर 690 (ई) 6 नोव्हेंबर, 2020 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार आता टोलनाक्यांवर फास्टॅगच्या माध्यमातूनच टोल वसुली करण्यात येणार आहे.
केंद्रीय मोटार वाहन कायदा, 1989 अनुसार 1 डिसेंबर 2017 पासून नवीन चारचाकी गाडीची नोंदणी करतानाच गाडीवर फास्टॅग लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. गाडीची खरेदी करतानाच फास्टॅग वितरकाच्या माध्यमातून गाडीवर लावण्यासाठी पुरविण्यात येत आहेत. तसेच गाडीच्या ‘फिटनेस’चे प्रमाणपत्र दिले जाते, त्या त्यावेळी गाड्यांवर लावलेल्या फास्टॅगचे ‘फिटमेंट’ -नूतनीकरण केले जावे, असे अपेक्षित असून त्यासंबंधीचे आदेशही देण्यात आले आहेत. याशिवाय राष्ट्रीय परवाना असलेल्या वाहनांसाठी 1 ऑक्टोबर 2019 पासून फास्टॅगचे ‘फिटमेंट’ करणेही अनिवार्य केले आहे.
त्याचबरोबर वाहनाचा ‘थर्ड पार्टी’ विमा उतरवला जाईल आणि यासाठी फॉर्म 51मध्ये दुरूस्ती करण्यात येईल (विमा प्रमाणपत्र) त्याचवेळी वैध फास्टॅग असल्याचे ग्राह्य धरण्यात येणार आहे. नवीन फास्टॅगमध्ये ही सर्व माहिती समाविष्ट असल्यामुळे टोलनाक्यांवर फास्टॅगच्या छायाचित्रातून ही माहितीही मिळू शकणार आहे. हा नियम 1 एप्रिल 2021 पासून लागू असणार आहे.
टोलनाक्यांवर इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्याव्दारे 100 टक्के टोल जमा होत गेला तरच वाहने विनाअडथळा पुढे जावू शकणार आहेत, वाहनांना कुठेही न थांबता पुढे जाता यावे, यासाठी तसेच टोलनाक्यांवर वाहनांच्या रांगा लागल्यामुळे होणारे इंधनाचे नुकसान टाळण्यासाठी फास्टॅग लावणे बंधनकारक करण्यासाठी काढलेली अधिसूचना एक प्रमुख पाऊल आहे.
सर्व वाहनांना फास्टॅग लावणे शक्य व्हावे, यासाठी अनेक माध्यमांच्याव्दारे तसेच ऑनलाईन फास्टॅग उपलब्ध करून देण्यात येत आहेत. नागरिकांनी आपल्या सुविधेनुसार आगामी दोन महिन्यांत आपल्या चारचाकी वाहनांवर फास्टॅग लावून घेणे आवश्यक आहे.