मागणी पूर्ण न झाल्याने वरिष्ठांना हाताशी धरून पीडित महिला अधिकाऱ्याचेच निलंबन
पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी दखल घेतल्याने अखेर गुन्हा दाखल
जालना: विलास इंगळे
महावितरणच्या मस्तगड येथील कार्यालयातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता आर. के. जाधव याच्यावर कार्यालयातील महिला अधिकाऱ्याच्या विनयभंग प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अभियंता मागील दहा महिन्यांपासून या महिला अधिकाऱ्याचे मानसिक, आर्थिक व शारीरिक शोषण करत असल्याचे यासंदर्भात पोलीस अधीक्षक एस चैतन्य यांच्याकडे दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे. दरम्यान, अभियंता याच्यावर ठोस कारवाई न करता या महिला अधिकाऱ्याची जालना येथून बदली करण्यात आली व त्यानंतर वरिष्ठांनी निलंबीत केले असल्याने वरिष्ठ अधिकारीही अशा संशयित व महिला अधिकाऱ्यांचे चारित्र्य हनन करणाऱ्यास पाठीशी घालत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
जालना येथील चाचणी विभागात कार्यरत के. आर. जाधव हा अभियंता महिला अधिकाऱ्यास कार्यालयात रात्री उशिरापर्यंत थांबवून ठेवणे. स्वत:च्या केबिनमध्ये बोलावून अंगाला स्पर्श करून त्रास देत असे. याबरोबरच अश्लील भाषा वापरून शरीर संबंध ठेवण्याची मागणी करणे. तसे न केल्यास नोकरीतून काढून टाकण्याची धमकी देत असे. तसेच माझे वरिष्ठांशी चांगले संबंध असून माझे कोणीच काही करू शकत नाही, अशी अरेरावीची भाषा वापरत असे.
यासंदर्भात दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, अतिरिक्त कार्यकारी अभियंता जाधव यांनी 18 ऑक्टोबर 2019 रोजी जालना येथील एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये संबंधित महिला अधिकाऱ्यास मीटर तपासणीसाठी पाठवले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत कार्यालयात थांबवून ठेवले. तसेच कार्यालयात एकटीच असल्याचा गैरफायदा घेत अंगाशी लगट करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, 15 ऑक्टोबर 2019 रोजीही या महिला अधिकाऱ्यास मीटर आणण्यासाठी एकटीलाच गाडीत औरंगाबादला पाठविले. त्यावेळी चालकाने मद्दप्राशन केलेले होते. दरम्यान, प्रवास करत असलेले वाहन मध्येच बंद पडल्याने कार्यालयात येण्यास रात्रीचे साडेनऊ वाजले. त्रास देण्याचा हा प्रकार 18 ऑक्टोबर 2019 ते 20 ऑगस्ट 2020 हा तब्बल दहा महिने सुरू होता, असेही तक्रारीत म्हटले आहे. पोलीसांनी दखल न घेतल्याने अखेर पोलीस अधीक्षक एस. चैतन्य याांना, पीडित महिला अधिकाऱ्याने तक्रार अर्ज दिल्यानंतर पोलीसांनी गुन्हा दाखल केला.
विशाखा समिती, राज्य महिला आयोगाडे तक्रार:
दरम्यान, पीडित महिला अधिकाऱ्याने महिलांच्या शोषणासंदर्भात चौकशी करणाऱ्या विशाखा समितीकडेही तक्रार दिली होती. विशाखा समितीने केलेल्या तपासात तफावत आढळल्यामुळे विशाखा समितीबाबतही संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणात छळ करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई होत नसल्याने अखेर पीडित महिला अधिकाऱ्याने राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या अनुषंगाने महिला आयोगाने सुनावणी घेऊन संबंधितांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्यावर संशयाची सुई:
पीडित महिला अधिकाऱ्याने राज्य महिला आयोगाकडे दिलेल्या तक्रार अर्जात, मुख्य अभियंता सुरेश गणेशकर हेही त्रास देत असल्याचे म्हटले आहे. गणेशकर हे मिटींगमध्ये अपमानास्पद बोलतात, गप्प बस, बोलू नकोस, कॉप्या करून पास झालीस, नालायक.. मुर्ख..पाट्या टाकायची लायकी आहे, तुझी असे म्हणून मानहानी करतात. तसेच त्यांनी अधीक्षक अभियंता हुमणे यांच्यावर दबाब टाकून मला त्रास देण्याच्या हेतूने वारंवार चुकीच्या पद्धतीने पत्र देऊन मला त्रास दिला आहे. विशेष म्हणजे संबंधित महिला अधिकाऱ्याच्या वडिलांनी गणेशकर यांच्याविरोधात अन्य एका प्रकरणात न्यायालयात खटला दाखल केला आहे. तो खटला मागे घेण्यासाठी गणेशकर त्रास देत असल्याचे म्हटले आहे. याबरोबरच मुख्य अभियंता गणेशकर यांनी अधीक्षक अभियंता हुमणे यांच्यावर दबाव टाकून आपणास निलंबीत केले असल्याचेही पीडित महिलेने तक्रार अर्जात म्हटले आहे.