# खासदार संजय राऊत यांच्याविरोधात एफआयआर दाखल.

नवी दिल्लीः शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या सरचिटणीस दीप्ती भारद्वाज यांनी ९ डिसेंबर रोजी दाखल केलेल्या तक्रारीवरून १२ डिसेंबर रोजी राऊत यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. ९ डिसेंबर रोजी संजय राऊत यांची एक मुलाखत प्रसारित झाली होती. त्या मुलाखतीत राऊत यांनी भाजप कार्यकर्त्यांसाठी अपशब्द वापरल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.

संजय राऊत हे शरद पवार यांना खुर्ची देतानाचा एक फोटो सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. या फोटोवरून भाजपच्या काही नेत्यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावर संजय राऊत यांनी संताप व्यक्त करत पितृतुल्य नेत्याला खुर्ची देण्यात वावगे ते काय? असा सवाल उपस्थितीत केला होता. पवारांच्या जागी वाजपेयी किंवा आडवाणी जरी असते तरी मी त्यांना खुर्ची दिली असती, असेही ते म्हणाले होते. त्याचबरोबर या सगळ्या गोष्टीत राजकारण आणू नका, च्युतेगिरी बंद करा, अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली होती.

राऊत यांच्या याच वक्तव्यावर दीप्ती भारद्वाज यांनी मंडावली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आता या प्रकरणी संजय राऊत यांच्यावर महिलांचा अवमान केल्याप्रकरणी तसेच महिलांसाठी सामाजिकरित्या अपशब्द वापरल्या प्रकरणी कलम ५०० आणि ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मी वापरलेल्या शब्दाचा अर्थ ‘मूर्ख’ -राऊतः दरम्यान, एफआयआर दाखल झाल्यानंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी जो शब्द वापरला आहे, त्याचा अर्थ मूर्ख असा आहे. देशाच्या शब्दकोशामध्ये त्याचा अर्थ दिला आहे. त्या शब्दकोशांना सरकारची मान्यता आहे. मोठ्या मोठ्या लोकांनी त्या शब्दावर आपले मत व्यक्त केले आहे. दिल्लीत माझ्याविरुद्द एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. सूडाच्या भावनेने माझा आवाज दाबण्यासाठी हे केले आहे. सीबीआय, ईडी आतापर्यंत माझ्यापर्यंत पोहोचलेले नाहीत. कारण मी सरळ माणूस आहे. मला त्रास देण्यासाठी आणि माझ्या पक्षाची बदनामी करण्यासाठी ही तक्रार करण्यात आली आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.

इथे आमच्या महिलांनी त्यांच्या नेत्या विरोधात तक्रार केली तर त्यांनी तिथे माझ्या विरोधात तक्रार केली, असे चालत नाही. तुम्ही संविधानाबद्दल बोलता आणि संसदेचे अधिवेशन चालू असताना खासदाराविरोधात खोटा गुन्हा नोंदवण्यासाठी प्रोत्साहन देता, हे ठिक नाही. ज्याबद्दल गुन्हा दाखल होऊच शकत नाही त्यासाठी कोणाला तरी पुढे करुन तक्रार केली जाते. मलाही सांगायचे आहे की, ही शिवसेना आहे, असेही राऊत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *