पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन झाल्यामुळे प्रदुषण घटले. त्याचा सकारात्मक परिणाम मान्सूनच्या प्रवासावर झाला असून, दरवर्षी 8 जुलैला देश व्यापणारा मान्सून यंदा चक्क बारा दिवस आधीच म्हणजे 26 जूनला संपूर्ण देशात पोहचला आहे. असा अनुकूल बदल गेल्या कित्येक वर्षात प्रथमच दिसून आला आहे.
पुणे वेधशाळेतील हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी, आज शुक्रवार, 26 जुलै रोजी मान्सूनने संपूर्ण देश व्यापला असल्याचे जाहीर केले. यावर्षी केरळमध्ये 2 जून तर महाराष्ट्रात 13 जूनला मान्सूनचे आगमन झाले होते. त्यानंतर मान्सूनला उत्तरेकडे प्रवास करण्यास पोषक वातावरण निर्माण झाल्याने गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली, जम्मू कश्मीर आणि लडाखपर्यंत 25 जूनला मान्सून पोहचला. शुक्रवारी मान्सूनने संपूर्ण देश व्यापल्याची घोषणा हवामानशास्त्र विभागाने केली आहे.
30 जूनपर्यंत राज्यात पाऊस सुरूच राहणार: बिहारपासून पूर्व विदर्भ पार करून ते छत्तीसगडपर्यंत द्रोणीय स्थिती आहे. तसेच कर्नाटकपासून केरळच्या किनारपट्टीपर्यंत चक्रीय स्थितीचा प्रभाव आहे. या दोन्ही स्थितीमुळे कोकणसह मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात 26 ते 30 जूनपर्यंत विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.