पुणे:राज्याने सौर ऊर्जा निर्मिती योजनेच्या अंमलबजावणीमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत महावितरणला राष्ट्रीयस्तरावरील सहा पुरस्कारांनी शनिवारी (दि. २९) गौरवण्यात आले. पणजी (गोवा) येथील कार्यक्रमात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याहस्ते महावितरणचे संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे, पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी पुरस्कार स्वीकारले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री भगवंत खुबा, गोव्याचे ऊर्जामंत्री सुदीन ढवळीकर, ‘एआयआरईए’चे अध्यक्ष साकेत सुरी उपस्थित होते. या कार्यक्रमात केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्री. खुबा यांनी महावितरणच्या ‘सौर’ योजनेतील कामगिरीचे विशेष कौतुक केले.
छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी ‘नॅशनल पोर्टल फॉर रूफटॉप सोलर’ या वेबपोर्टलचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते मागीलवर्षी झाले होते. या वेबपोर्टलच्या वर्षपूर्तीनिमित्त पणजी जिमखाना येथे केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय आणि ऑल इंडिया रिन्यूएबल एनर्जी असोसिएशनच्या (एआयआरईए) वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या नेतृत्वात छतावरील सौर ऊर्जा योजनेच्या सुलभ व लोकाभिमुख अंमलबजावणीमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामांसाठी महावितरणचे संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या योजनेच्या ग्राहक प्रबोधन व जनजागरणासाठी विविध माध्यमांद्वारे केलेल्या कामाची दखल घेत पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. योजनेसंबंधी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, महावितरण विशेष प्रकल्प कक्षाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा, कार्यकारी अभियंता शरद बंड यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले.