पुणे: आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ थोरॅसिक सायन्सेस (एआयसीटीएस, पुणे) ही राष्ट्रीय स्तराची एक प्रमुख संस्था आहे, जी हृदय विकार, कार्डिओ-थोरॅसिक शस्त्रक्रिया, पल्मोनरी आणि इंटरव्हेंशनल रेडिओलॉजी आणि पॅथॉलॉजी आदींशी निगडित उपचार करते. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे रुग्णालय केवळ सशस्त्र दलातील कोविड रुग्णांसाठीच नव्हे तर पुणे व आसपासच्या भागातील सामान्य रुग्णांसाठीही आधार ठरत आहे.
मार्च 2020 मध्ये कोविड 19 च्या वाढत्या घटना लक्षात घेता पुण्यात लष्कराचे स्वतंत्र कोविड 19 रुग्णालय असणे आवश्यक होते जेणेकरुन बहुउद्देशीय सदन कमांड रुग्णालयाला बिगर-कोविड रुग्णांवर व्यवस्थित उपचार करता येतील. मुख्यत: सेवेतील कर्मचारी, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांवर उपचार करण्यासाठी 29 मार्च 2020 पासून एआयसीटीएस, कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतरित करण्यात आले. 600 खाटांचे हे रुग्णालय कोविड सुविधा असलेल्या 400 खाटांच्या रुग्णालयात रूपांतरित करण्यात आले. यामध्ये 350 अलगीकरण खाटा, 20 खाटा गंभीर रुग्णांसाठी (व्हेंटिलेटर), 30 इंटेन्सिव्ह केअर युनिट (आयसीयू) चा समावेश आहे.
स्थानिक प्रशासनाच्या निर्देशानुसार एआयसीटीएस पुणे जिल्ह्यातील कोविड 19 संक्रमित पोलीस कर्मचारी आणि नागरिकांची काळजी घेत आहे. रूग्णालयात अनेक मल्टि-ऑर्गन प्रकरणे व्यवस्थितपणे हाताळली गेली आहेत. तसेच हे रुग्णालय अनेक संशोधन प्रकल्पांमध्ये महत्वपूर्ण सदस्य राहिला आहे. कोविडवरील उपचारासाठीच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या “सॉलिडॅरिटी चाचणी” वरील अभ्यासातही रुग्णालयाची महत्वपूर्ण भूमिका राहिली आहे.
रुग्णालयात आजपर्यंत 1650 पेक्षा जास्त कोविड रूग्ण दाखल झाले आहेत आणि 1333 हून अधिक रुग्णांना घरी सोडण्यात आले असून रुग्ण बरे होण्याचा दर 81 टक्के आहे. 322 हून अधिक गंभीर नागरी रूग्णांना दाखल करण्यात आले होते आणि 55 पोलीस कर्मचार्यांवर आयसीयूमध्ये उपचार करून त्यांना सोडण्यात आले आहे. पुणे कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटलला संस्थेने आयसीयूची आवश्यकता असलेल्या 40 हून अधिक रूग्णांची काळजी घेत मदत केली आहे.