मान्सून 1 जूनलाच केरळात दाखल होणार; देशात यंदा 96 ते 104 टक्के बरसणार
पुणे: देशात सलग तिसऱ्या वर्षी मान्सून चांगला राहणार असून, तो एक जूनलाच केरळात दाखल होणार आहे. असे व्टिट पृथ्वी मंत्रालयाचे सचिव माधव राजीवन यांनी केले. त्यांच्या म्हणण्यानुसार मान्सून यंदा देशात 96 ते 104 टक्के बरसणार आहे.
दिल्ली येथील पृथ्वी मंत्रालयाचे सचिव माधव राजीवन यांनी गुरूवारी मान्सून बाबत विस्तृत व्टिट केले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार केरळ मध्ये यंदा नेहमीप्रमाणे 1 जूनलाच मान्सून दाखल होणार आहे. त्यानंतर हवामानाच्या स्थितीनुसार मान्सून देशात टप्प्याटप्प्याने सरकत राहिल. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्यावतीने 15 मे रोजी मान्सूनचा दुसरा अधिकृत अंदाज जाहीर करण्यात येणार आहे. यावर्षी सरासरी मान्सून 96 ते 104 टक्के पडेल. यावर्षी ‘कप्लड वैश्विक जलवायू’ मॉडेलवर आधारित मान्सूनचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे.
राजीवन यांनी सांगितले की, दर वर्षी हवामान विभाग मे, जून आणि ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून बाबत तीन अंदाज जाहीर करत असते. यामध्ये पहिल्या अंदाजामध्ये देशात मान्सून कसा राहिल तर दुसऱ्या अंदाजात नेमका केरळमध्ये कधी दाखल होईल आणि त्याची पुढील वाटचाल तर तिसऱ्या अंदाजामध्ये शेवटच्या दोन महिन्यामधील पाऊस आणि परतीचा अंदाज याबबत माहिती देण्यात येते. मात्र, यावर्षीपासून मान्सूनच्या कालावधीत प्रत्येक महिन्याला म्हणजेच मे, जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर असा महिन्याला अंदाज जाहीर केला जाणार आहे. तसेच देशातील प्रत्येक राज्याचा मान्सूनचा अंदाज देण्याचा प्रयत्न राहील.
मान्सून वेळेआधीच दाखल होण्याची शक्यता
मान्सून यंदा केरळच्या दक्षिण भागावर प्रथम 1 जूनला दाखल होईल. यंदा उन्हाळ्यात ऊन चांगलेच तापले आहे. त्यामुळे मान्सून वेळेआधीच दाखल होण्याची शक्यता आहे. तळकोकणात मान्सून 5 ते 7 जूनच्या दरम्यान दाखल होईल. त्यानंतर तो राज्यभरात येईल असा अंदाज हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे.