पुणे: राज्यातील मध्यमहाराष्ट्र, कोकण, विदर्भासह मराठवाड्याच्या काही भागात पुढील तीन दिवस (दि.10) विजांच्या कडकडाट व मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता वाढली आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. विशेषत: कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात मुसळधार पावसाचा जोर असणार आहे.
राज्यातील काही भागात मागील काही दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा वाढला आहे. दिवसभर कडक उन्हाचा तडाखा आणि सायकांळी विजांच्या कडकडाट व मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे झाडांच्या फांद्या तुटणे, झाडे मुळासकट उन्मळून पडणे याबरोबरच वीज प्रवाह खंडित होणे, अशा घटनामध्ये वाढ होत असल्याचे चित्र राज्याच्या काही भागात दिसून येत आहे. अशीच स्थिती 10 सप्टेंबरपर्यंत राहणार आहे. विशेषत: पुणे (घाट माथा), रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली या भागात पावसाचा जोर राहणार आहे. तर मुंबई, ठाणे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, या भागात मुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे, असा अंदाज आहे. मात्र, त्यानंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.
याबाबत हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्राच्या मध्यपूर्व भागापासून ते कर्नाटकच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा गेल्या काही दिवसांपासून कार्यरत आहे. पुढील 24 तासात या पट्ट्यांची तीव्रता कमी होणार आहे. त्यामुळे पावसाचा जोर कमी होत जाणार आहे. साधारणपणे 10 सप्टेंबरपासून हा जोर कमी झालेला असेल असेही सांगण्यात आले आहे.