मुंबई: काँग्रेसचे माजी बीड जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई कार्यालयामध्ये हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, धनंजय मुंडे, संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत मोदी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
राजकिशोर मोदी यांच्या ताब्यातील अंबाजोगाई पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या राज्यभरात १७ शाखा आहेत. अंबाजोगाई नगर परिषद २५ वर्षांपासून त्यांच्या ताब्यात आहे. गेल्या ३० वर्षांपासून ते काँग्रेसचं काम करत होते. १४ वर्षे युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहीले आहे. तसेत २०१३ ते २०१४ या कालावधीत ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी होते. २००९ ते २०१८ पर्यंत ते महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादन पणन महासंघ नागपूरचे उपाध्यक्ष होते.
यावेळी मोदी यांच्यासह त्यांचे समर्थक, नगरसेवक व अंबाजोगाई पीपल्स बँकेचे पदाधिकारी यांनीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यामध्ये कापूस पणन महासंघाचे उपाध्यक्ष ऍड विष्णूपंत सोळंके, माजी उपाध्यक्ष तथा नगरसेवक मनोज लखेरा, महादेव अदमाने, वाजेद खतीब, धम्मपाल सरवदे, सुनील व्यवहारे, अमोल लोमटे, दिनेश भराडिया, संतोष शिनगारे, अंबाजोगाई पीपल्स बँकेचे उपाध्यक्ष प्रकाशचंद्र सोळंकी यांच्यासह समर्थकांचा समावेश आहे.