फलटण: पवारवाडी येथे असलेल्या ज्योतिर्लिंग हायस्कूलमध्ये सन १९९१ ते १९९७ या कालावधीत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा रविवार, ८ मे रोजी उत्साहात पार पडला.
ज्योतिर्लिंग हायस्कूलमध्ये १९९१ ते १९९७ या कालावधीत इयत्ता पाचवी ते दहावी या वर्गामध्ये शिक्षण घेतलेले सुमारे ४५ विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते. या स्नेहमेळाव्यास हायस्कूलचे प्राचार्य विलास शेडगे, माजी शिक्षक महादेव मोहिते, नाना सावंत, दादासाहेब जगताप, सुधीर निकम, विठ्ठल हंकारे, पोपट कातळगे, दत्तात्रय घोरपडे, पोपट पवार, अरविंद आगवणे, विष्णू पोतेकर, मोहन झणझणे, मदन इंगवले तसेच शिपाई मामा महारूद्र घोगरे उपस्थित होते. या प्रसंगी माजी शिक्षकांचा सत्कार सन्मानचिन्ह, शाल, पुस्तक, श्रीफळ व एक रोप देऊन करण्यात आला.
शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी यावेळी शाळेतील मुलांसाठी स्मार्ट टीव्ही भेट दिला. तसेच यावेळी मातृ दिनानिमित्त माजी विद्यार्थिनींकडून वृक्षारोपण करण्यात आले. शिक्षकांनी या स्नेहसंमेलन प्रसंगी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या शाळेतील आठवणींना उजाळा देऊन सर्व विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन माजी विद्यार्थी धनंजय पवार, संतोष खाडे, नितीन वरे, भरत पवार, भारत मोरे, संजय हरिहर, बिपीन जगताप, हेमंत आटोळे आणि शेखर लोणकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी कापसे, कविता क्षीरसागर व बिपीन जगताप यांनी केले. संजय पवार यांनी आभार मानले.