आझम कॅम्पस शैक्षणिक सामाजिक परिवाराचा उपक्रम; दररोज ३ हजार गरजूंना मोफत अन्न पाकिटांचे वितरण
पुणे: कोरोना साथीमुळे हलाखीची परिस्थिती निर्माण झालेल्या कष्टकऱ्यांसाठी आझम कॅम्पस ‘शैक्षणिक सामाजिक परिवाराच्या वतीने पुण्यातील मध्य भागात ‘सेंट्रल किचन’ सुरु करण्यात आले असून दररोज सायंकाळी ३ हजार गरजूंना अन्न पाकिटांचे वितरण मोफत करण्यात येत आहे. मंगळवारी सायंकाळी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांच्या हस्ते या सामाजिक उपक्रमाचा प्रारंभ झाला.
आझम कॅम्पस, गोल्डन ज्युबिली एज्युकेशन ट्रस्ट, अवामी महाज सामाजिक संघटना यांनी संयुक्तपणे हा उपक्रम सुरु केला आहे. शहरातील कष्टकरी, कामगार, गरजू विभागांनुसार दररोज १३ ठिकाणी प्रत्येकी २५० अन्न पाकिटांचे वितरण करण्यात येत आहे. भवानी पेठ मधील गोल्डन ज्युबिली एज्युकेशन ट्रस्ट च्या आवारात ‘सेंट्रल किचन’ स्थापित करण्यात आले आहे. हा उपक्रम पहिल्या टप्प्यात १० दिवस चालणार असून गरजेनुसार त्याची व्याप्ती आणि मुदत वाढविण्यात येणार आहे .
हॉस्पिटलच्या बाहेर बसलेल्या व्यक्ती, तसेच पदपथांवर बसलेले कष्टकरी, गरजू, झोपडपट्टीतील व्यक्ती, ससून हॉस्पिटल, नायडू हॉस्पिटल, कमला नेहरू हॉस्पिटल, मार्केट यार्ड, येरवडा, खडकी, दापोडी, ताडीवाला रोड, भवानी पेठ, नाना पेठ, गंज पेठ, कॅम्प, सय्यद नगर अशा ठिकाणी रिक्षा टेम्पोतून अन्न पाकिटे रोज सायंकाळी वितरित केली जात आहेत. गरजू, कष्टकऱ्यांना रोज किमान एकदा अन्न मिळावे, त्यांनी उपाशी पोटी झोपू नये याची काळजी घेतली जात आहे. मंगळवारी सायंकाळी सुरु झालेल्या उपक्रमात एस.ए. इनामदार, वहाब शेख, अफझल खान, साबीर शेख, शाहिद शेख इत्यादी सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.