पुणे: सायबर पोलिस ठाण्यातील मारहाणीचा प्रकार ताजा असतानाच आज सोमवारी सकाळी शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये ‘फ्री स्टाईल’ मारामारी झाल्याचा प्रकार घडला. या घटनेची पुणे पोलिस दलात जोरदार चर्चा झाल्याने वरिष्ठांकडून संबंधीत प्रकरणात गांभीर्याने लक्ष घातले आहे. संबंधीत प्रकरणातील दोन्ही महिला पोलीस मुख्यालयात नेमणुकीस आहेत. एक महिला पोलीस नाईक, तर दुसरी पोलीस शिपाई आहे.
दोघीही नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी मुख्यालयामध्ये उपस्थित होत्या. त्यावेळी ड्युटीच्या कारणावरुन दोघींमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. त्यानंतर दोघींनी एकमेकींना शिवीगाळ केल्याने त्याचे पर्यवसन भांडणामध्ये झाले. त्यावेळी पोलीस शिपाई कर्मचाऱ्याने पोलिस नाईक महिलेवर हात उचलला. या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात आरडाओरड झाल्याने तेथे बघ्यांची गर्दी जमली. त्यातूनच ही बातमी पोलीस दलात पोचून त्याविषयी जोरदार चर्चा सुरू झाली. दरम्यान, महिला पोलीस कर्मचाऱ्यांमधील भांडणाचा हा प्रकार मुख्यालयाचे प्रभारी पोलिस उपायुक्त मितेश घट्टे यांच्यापर्यंत पोचला. त्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन खात्याअंतर्गत चौकशी करणार असल्याचे स्पष्ट केले.