संग्रहित छायाचित्र
पुणे: पुणे जिल्ह्यातील पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे, खडकी व देहूरोड छावणी परिषद, नगरपरिषद, नगरपालिका, नगरपंचायत व पुणे ग्रामीण क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर सर्व क्षेत्रामध्ये पेट्रोल, डिझेल पंपचालकांनी येणाऱ्या सर्व वाहनांना पास, ओळखपत्राची मागणी न करता सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेमध्ये पेट्रोल, डिझेलचा पुरवठा करण्यात यावा. तसेच राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल, डिझेल शासनाने वेळोवळी निर्गमित केलेल्या विहित वेळेमध्ये सुरु राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिले आहेत.
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3,4 मधील तरतुदीची अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित केली आहे. त्याबाबतची नियमावली संदर्भीय 3 अन्वये प्रसिध्द केली आहे आणि जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी घोषित केले आहे. कोरोना विषाणूचा साथ संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने आपत्कालीन उपाययोजनेचा भाग म्हणून संदर्भिय 4 अन्वये गृहसचिव आणि अध्यक्ष राष्ट्रीय कार्यकारी समिती भारत सरकार, यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 10 (2) अन्वये संपूर्ण देशभरात मार्गदर्शक सूचना, आदेश लागू केलेले आहेत. या अनुषंगाने नागरिकांची गर्दी होवू नये आणि परस्पर संपर्क होवून संसर्ग वाढू नये याकरिता जमावबंदी आदेश लागू केलेले आहेत आणि उपरोक्त संदर्भ क्र.1 व 2 अन्वये सदरचे लॉकडाऊनचे आदेशास 17 मे 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.