अंबाजोगाई: स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात कोरोनाचे उपाचार घेत असताना मृत्यू झालेल्या दोन मृतदेहांवर अंबाजोगाई नगरपालिकेने सोमवार, २७जुलै रोजी रात्री संत रविदास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.
तीन दिवसांपूर्वी कोरोनाबाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याच्या जागेवरून अंबाजोगाईत तणाव निर्माण झाला होता. बोरूळ तलाव स्मशानभूमीत विरोध झाल्यावर स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय स्टेडियम परिसरात अंत्यसंस्कार करण्याचे ठरविण्यात आले. तेथेही विरोध झाला. त्यानंतर क्रांतिनगर व सर्वे नंबर 17 साकूड रोडवर अंत्यसंस्कार करण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र, अंत्यसंस्कारास विरोध होत असल्यामुळे सामाजिक बांधिलकीच्या भावनेने अंबाजोगाई शहरातील मोची बांधवांनी पुढाकार घेेेेतला. संत रविदास स्मशानभूमीत कोरोनाबाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार करावेत, अशी मागणी श्री संत रविदास समाज व सामाजिक संघटनेचे अध्यक्ष नंदकिशोर परदेशी, सचिव पूनमचंद परदेशी, उपाध्यक्ष श्रावणकुमार चौधरी, भीमसेन अंबेकर, संतोष चौधरी आदींनी केली होती.
संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण:
माजलगाव येथील दोन जणांवर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात कोरोनाचे उपाचार सुरू असताना मृत्यू झाला होता. त्यानंतर दोन्ही मृतदेहावर संत रविदास मोची स्मशानभूमीत रात्री माजलगाव येथील एक स्त्री आणि पुरुष यांच्यावर नगरपालिकेच्या स्वच्छता विभाग कोविड टीमकडून अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधी झाल्यानंतर संपूर्ण मृतदेह जळाला याची खात्री झाल्यानंतर रात्री हा संपूर्ण परिसर निर्जंतुकीकरण करून घेण्यात आला. तसेच अंत्यविधीसाठी वापरण्यात आलेले सर्व साहित्य तेथेच नष्ट करण्यात आले.