# खा.राजीव सातव यांच्यावर कळमनुरीत अंत्यसंस्कार.

हिंगोली: युवक काँग्रेसचे नेते खासदार राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवार, 17 मे रोजी शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात आज सकाळी ११ वाजता त्यांच्या कळमनुरी येथील निवासस्थानाजवळ खुल्या मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सातव यांच्या निधनाची वार्ता समजताच कालपासूनच त्यांच्या कळमनुरी येथील निवासस्थानी चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. अंत्यविधीला राज्यस्तरीय, स्थानिक नेते, मंत्री मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजीव सातव यांचे पार्थिव असलेल्या अ‍ॅम्ब्यूलन्सवर पुणे ते कळमनुरी या मार्गावर पुष्पवृष्टी करण्यात आली. रविवारी रात्री ८ वाजता खासदार राजीव सातव यांचे पार्थिव कळमनुरी येथे पोहचताच कार्यकर्त्याना अश्रू अनावर झाले आणि अनेकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. राजीव सातव यांच्या आई रजनीताई सातव, पत्नी डॉ. प्रज्ञा, मुलगा, मुलगी आणि जवळचे नातेवाईक पार्थिवाजवळ बसून होते

राहूल गांधी, प्रियंका गांधी यांच्यातर्फेही पुष्पचक्र अर्पण…
अंत्यविधीला काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी हे सुरक्षा कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत. परंतु राहूल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी दिलेल्या सूचनेनुसार, त्यांच्या वतीने काँग्रेस नेत्यानी राजीव सातव यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले.

पालकमंत्री वर्षा गायकवाड या रात्रीपासूनच सातव यांच्या घरी होत्या. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, उद्योग मंत्री अशोक चव्हाण, मंत्री अस्लम शेख, काँग्रेस नेते नाना पटोले, सत्यजीत तांबे, कळमनुरीचे आमदार संतोष बांगर, माजी आमदार संतोष टारफ़े, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकूळे, माजी आमदार रामराव वडकुते यांच्यासह आजी माजी आमदार, खासदार यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *