उज्जैन: उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांच्या हत्येला जबाबदार असलेला मुख्य आरोपी व गँगस्टर विकास दुबे याला पोलिसांनी मध्य प्रदेशातील उज्जैन येथून अटक केली आहे. विकासच्या पाच साथीदारांचे पोलिसांनी एन्काऊंटर केले. त्यातील त्याच्या तीन साथीदारांना काल तर दोन साथीदारांना आज ठार करण्यात आले. दरम्यान, विकास दुबे दर्शनासाठी प्रसिद्ध महाकाल मंदिरात आला होता. त्यालाही आपले एन्काऊंटर केले जाईल या भीतीने पछाडले होते, त्यामुळे त्याने स्वत: आपणच विकास दुबे असल्याचे ओरडून सांगितल्यावर त्याला तेथील सुरक्षा रक्षकांनी त्याब्यात घेऊन पोलीसांना पाचारण केले.
कानपूर येथे अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर विकास दुबे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. या गोळीबारात डिवायएसपीसह आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून विकास दुबे फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. त्याला पकडण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी 5 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.
विकास दुबे मध्यप्रदेशातील महाकाल मंदिरात पूजा आणि दर्शनासाठी असलेल्या रांगेत उभा होता. त्याने ओरडून ओरडून स्वतः विकास दुबे असल्याचे सांगितले. नंतर मंदिर परिसरात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडले आणि पोलीसांना याबाबत माहिती दिली. विकास दुबेला उज्जैनमधील फ्रिंगज पोलीस ठाण्यात आणण्यात आले.