पुणे विभागात ‘अनलाॅक’नंतर 83 हजारांवर नवीन वीजजोडण्या
पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लॉकडाऊनमध्ये गेल्यानंतर महावितरणकडून जून महिन्यापासून पुणे प्रादेशिक विभागात नवीन वीजजोडण्या देण्यासाठी वेग देण्यात आला आहे. यात गेल्या चार महिन्यांमध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यांत सर्व वर्गवारीतील 83 हजार 316 नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. दरम्यान, महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईटवर तसेच मोबाईल अॅपद्वारे नवीन वीजजोडणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गेल्या मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरु आहे. एप्रिल, मे महिन्यात कडकडीत लॉकडाऊन असल्याने महावितरणकडून वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे काम वगळता इतर कामकाज ठप्प झाले होते. मात्र, जूनपासून अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली व सर्व प्रशासकीय कामांना वेग देण्यात आला आहे. यामध्ये नवीन वीजजोडण्या देण्याच्या कामास प्राधान्य देत आवश्यक प्रक्रिया वेगवान करण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिले होते. तर महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असीमकुमार गुप्ता यांनी पुणे प्रादेशिक विभागाचा आढावा घेऊन नवीन वीजजोडण्यांसाठी प्राप्त झालेल्या अर्जांवर वेगाने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.
त्याप्रमाणे गेल्या चार महिन्यांमध्ये पुणे जिल्ह्यात एकूण 44 हजार 27 नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुणे शहरातील 16 हजार 350, पिंपरी चिंचवड शहरातील 10 हजार 374 नवीन वीजजोडण्यांचा तसेच पुणे ग्रामीणमध्ये पुणे ग्रामीण मंडल अंतर्गत 12 हजार 82 व बारामती मंडल अंतर्गत 5 हजार 221 अशा एकूण 17 हजार 303 नवीन वीजजोडण्यांचा समावेश आहे. यासोबतच सातारा जिल्ह्यात 8 हजार 128, सोलापूर जिल्ह्यात 10 हजार 973, कोल्हापूर जिल्ह्यात 10 हजार 872 आणि सांगली जिल्ह्यात 8 हजार 316 नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.
ज्या ठिकाणी पायाभूत यंत्रणा उभारण्याची गरज नाही, त्याठिकाणी तत्काळ नवीन वीजजोडणी कार्यान्वित करण्यात यावी तसेच प्राप्त झालेल्या वीजजोडणीच्या अर्जांवर पुढील कार्यवाही वेगाने करावी, असे निर्देश पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी दिले आहेत.
लॉकडाऊनमध्ये प्रलंबित राहिलेल्या नवीन वीजजोडण्यांच्या अर्जांवरील प्रशासकीय व तांत्रिक कामे गेल्या जूनपासून प्राधान्याने व अत्यंत वेगाने सुरु आहेत. परिणामी पुणे प्रादेशिक विभागात सप्टेंबर अखेरपर्यंत 83 हजारांवर नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. सोबतच पुरेशा प्रमाणात वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नवीन वीजजोडणीबाबत तक्रार किंवा काही अडचण असल्यास संबंधीत विभागाचे कार्यकारी अभियंता यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईटवर तसेच मोबाईल अॅपद्वारे नवीन वीजजोडणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहे.